"माझा ALTT शी काही संबंध नाही, ४ वर्षांपूर्वीच.."; सरकारने बंदी घातल्यानंतर एकता कपूरने दिलं स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 14:54 IST2025-07-26T14:54:25+5:302025-07-26T14:54:47+5:30
सरकारने ALTT सहित इतर काही प्लॅटफॉर्मवर बंदी घातल्यानंतर एकता कपूरची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. काय म्हणाली?

"माझा ALTT शी काही संबंध नाही, ४ वर्षांपूर्वीच.."; सरकारने बंदी घातल्यानंतर एकता कपूरने दिलं स्पष्टीकरण
केंद्र सरकारने अलीकडेच अश्लील आणि अनैतिक कंटेंट प्रसारित करणाऱ्या काही OTT प्लॅटफॉर्म्सवर बंदी घातली आहे. या यादीत ALTT (पूर्वीचे ALT Balaji) या प्लॅटफॉर्मचाही समावेश आहे. सोशल मीडियावर काही लोकांनी या बंदीमुळे निर्माता-दिग्दर्शिका एकता कपूरवर टीका केली होती, कारण ALTT हा तिचा प्लॅटफॉर्म असल्याचं अनेकांना वाटत होतं. पण यावर आता एकता कपूरने स्पष्टीकरण दिलं आहे.
एकता कपूरने ALTT बंद झाल्यावर दिलं स्पष्टीकरण
एकता कपूरने सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं की, "ALTT प्लॅटफॉर्मशी माझा आणि माझ्या आईचा कुठलाही संबंध आता राहिलेला नाही. आम्ही दोघी जून २०२१ मध्येच ALTT मधून पूर्णपणे बाहेर पडलो आहोत. बालाजी टेलिफिल्म्स ही कंपनी स्वतंत्रपणे काम करत आहे आणि सरकारच्या बंदी निर्णयाशी त्यांचा काहीही संबंध नाही. जे लोक एकता कपूरचं नाव या प्रकरणात घेत आहेत, त्यांनी कृपया वस्तुस्थिती तपासूनच मत व्यक्त करावं आणि योग्य माहिती द्यावी.” असं अधिकृत स्टेटमेंट जारी करण्यात आलं आहे.
सरकारने या अॅपवर घातली बंदी
सरकारने ज्या प्लॅटफॉर्म्सवर बंदी घातली आहे, त्यांनी अश्लील व हिंसक दृश्यं, महिलांची गैरप्रकारे मांडणी, आणि कथानकाशिवाय केवळ उत्तेजक कंटेंट दाखवल्याचा आरोप आहे. यामुळे IT कायदा, महिला प्रतिष्ठा संरक्षण कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या काही कलमांचा भंग झाला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने सॉफ्ट पॉर्न कंटेंटवर मोठी कारवाई केली आहे. उल्लू अॅप, एएलटीटी, डेसिफ्लिक्स आणि बिग शॉट्स सारख्या सेमी पॉर्न प्रसारित करणाऱ्या अॅप्सवर बंदी आणण्यात आली आहे. केंद्र सरकारने याबाबत अधिसूचना जारी केली आहे.