कपाळावर आडवी चिरी अन्...; हास्यजत्रेतील महिला कलाकारांनी अनोख्या पद्धतीने साजरा केला 'सावित्री उत्सव', VIDEO पाहा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 17:06 IST2025-01-03T17:02:01+5:302025-01-03T17:06:01+5:30
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधील महिला कलाकारांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

कपाळावर आडवी चिरी अन्...; हास्यजत्रेतील महिला कलाकारांनी अनोख्या पद्धतीने साजरा केला 'सावित्री उत्सव', VIDEO पाहा
Maharashtrachi Hasya Jatra: स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, पहिल्या महिला शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुले (Savitri Bai Phule) यांच्याकडे पाहिलं जातं. आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र 'सावित्री उत्सव' साजरा करण्यात येत आहे. दरम्यान, सावित्राबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (maharashtrachi hasya jatra) मधील महिला कलाकारांनी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत त्यांना अनोखी मानवंदना दिली आहे. त्यांच्या या व्हिडीओचं सर्वत्र कौतुक होताना दिसतंय.
अभिनेत्री नम्रता संभेराव, शिवाली परब यांनी सोशल मीडियावर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनी खास व्हिडीओ शेअर केल्याचा पाहायला मिळतोय. या व्हिडीओमध्ये महाराष्ट्राची हास्यजत्रा मधील महिला कलाकार एकत्र दिसत आहेत. नम्रता संभेराव, शिवाली परब, वनिता खरात तसेच रसिका वेंगुर्लेकर, चेतना भट आणि ईशा डे या सगळ्यांनी गाण्याच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले यांच्यााप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. व्हिडीओमध्ये"साऊ पेटती मशाल, साऊ आग तू जलाल..." ही कविता त्या म्हणताना दिसत आहेत.
पुढे व्हिडीओमध्ये त्या सावित्रीबाईंच्या कार्याची, स्त्री शिक्षणासाठी त्यांनी दिलेल्या लढ्याची माहिती सांगताना दिसत आहेत. त्यावेळी त्या म्हणतात, "नमस्कार, तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप-खूप शुभेच्छा. आम्ही सगळ्याजणी आज 'सावित्री उत्सव' साजरा करत आहोत. कारण, ३ जानेवारीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस असतो. गेल्या काही वर्षांपासून हा उत्सव साजरा केला जात आहे. तुम्ही, आम्ही आणि भारतातील सगळ्या मुली आज मोकळेपणाने शिक्षण घेऊ शकत आहेत. याशिवाय शिक्षण पूर्ण झाल्यावर हव्या त्या क्षेत्रात काम करु शकतात. हे ज्यांच्यामुळे शक्य झालंय त्यांच्या जन्मदिवशी उत्सव साजरा झालाच पाहिजे. हा स्त्री जागर आपण सगळ्यांनी केला पाहिजे. कारण, प्रस्थापितांच्या विरोधात जाऊन स्त्री शिक्षणाची, स्त्रियांच्या हक्कासाठी, त्यांच्या सन्मासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांनी मोठा लढा दिला आहे. त्यांच्या या सगळ्या कार्याची आठवण आपण उराशी कायम जपून ठेवली पाहिजे. म्हणून प्रत्येकाने आपआपल्या उंबऱ्याबाहेर ज्ञानाची एक पणती लावली पाहिजे, आणि आम्ही सगळ्यांनी आमच्या कपाळावर जी चिरी लावलीये ती, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आशीर्वाद आहे, असं आपण सगळ्यांनी समजलं पाहिजे."
त्यांच्या या व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंट्स करत त्यांचं कौतुक करताना दिसत आहेत. या व्हिडीओवर, "तुम्ही खऱ्या सावित्री आईंच्या मुली त्यांना अशा पद्धतीने जिवंत ठेवू शकता...",अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. तर आणखी एका यूजरने म्हटलंय, "सावित्रीच्या लेकी", दरम्यान, सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय.