निलेश साबळे आणि भाऊ कदम यांचं झी मराठीवर दणक्यात कमबॅक; CHYD नाही तर 'या' शोमध्ये दिसणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 08:58 IST2025-12-15T08:57:23+5:302025-12-15T08:58:50+5:30
निलेश साबळे आणि भाऊ कदम हे पुन्हा एकदा झी मराठीवर दिसणार आहेत. त्यामागचं कारण खास आहे

निलेश साबळे आणि भाऊ कदम यांचं झी मराठीवर दणक्यात कमबॅक; CHYD नाही तर 'या' शोमध्ये दिसणार?
झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रम चांगलाच गाजला. डॉ. निलेश साबळेचं जबरदस्त सूत्रसंचालन आणि सहकलाकारांची त्याला मिळालेली तगडी साथ या जोरावर 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रम चांगलाच गाजला. काही दिवसांपूर्वी 'चला हवा येऊ द्या'चं नवीन पर्व सुरु झालं. पण या पर्वाचं सूत्रसंचालन अभिनेता अभिजीत खांडकेकरने केलं. पण आता प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे. झी मराठीवर निलेश साबळे दणक्यात कमबॅक करणार आहे. कारणही तसंच खास आहे.
निलेश साबळे - भाऊ कदमचं कमबॅक
निलेश साबळे आणि भाऊ कदम पाठमोरे उभे असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ ब्लॅक अँड व्हाईट असून भाऊ आणि निलेश स्टायलिश अंदाजात पाहायला मिळत आहेत. दोघे पाठमोरे असले आणि त्यांचा चेहरा दिसत नसला तरीही चाहत्यांनी निलेश आणि भाऊला ओळखलं आहे. निलेश आणि भाऊ 'चला हवा येऊ द्या' नव्हे तर वेगळ्याच शोमधून चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत. त्यामुळे सर्वांना उत्सुकता आहे.
निलेश आणि भाऊ कदम झी मराठीवरील 'उगाच' नावाच्या आगळ्यावेगळ्या शोमध्ये प्रेक्षकांन दिसणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून झी मराठीवर या शोचं प्रमोशन सुरु आहे. त्यामुळे सर्वांना या शोची उत्सुकता आहे. निलेश आणि भाऊ आता या शोमध्ये कशी छाप पाडणार याची सर्वांना उत्सुकता आहे. दरम्यान अभिजीत खांडकेकर सूत्रसंचालन करत असलेल्या 'चला हवा येऊ द्या'चं नवीन पर्व काही दिवसांपूर्वी संपलं आहे. त्यामुळे निलेश पुन्हा एकदा आगामी वर्षात २०२६ मध्ये 'चला हवा येऊ द्या'ची धुरा सांभाळणार का, याची सर्वांना उत्सुकता आहे.