Masaledar Kitchen Kallakar : सुरी पाहताच किशोरी पेडणेकरांना आठवतात संजय राऊत, पाहा धम्माल व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 14:18 IST2022-04-07T14:15:16+5:302022-04-07T14:18:58+5:30
Masaledar Kitchen Kallakar : मराठी चित्रपटगृष्टील लोकप्रिय कलाकारांपासून ते राजकारण्यांपर्यंत अनेकांनी आतापर्यंत ‘किचन कल्लाकार’च्या मंचावर हजेरी लावली आहे. अलीकडे या शोमध्ये हजेरी लावली ती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी.

Masaledar Kitchen Kallakar : सुरी पाहताच किशोरी पेडणेकरांना आठवतात संजय राऊत, पाहा धम्माल व्हिडीओ
Masaledar Kitchen Kallakar : झी मराठी या वाहिनीवरचा ‘किचन कल्लाकार’ हा कुकरी शो तुफान गाजला. इतकं की, पहिलं पर्व संपत नाही तेच या शोचं दुसरं पर्व ‘मसालेदार किचन कल्लाकार’ सुरू झालं. मराठी चित्रपटगृष्टील लोकप्रिय कलाकारांपासून ते राजकारण्यांपर्यंत अनेकांनी आतापर्यंत या शोच्या मंचावर हजेरी लावली आहे. अलीकडे या शोमध्ये हजेरी लावली ती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटील (Rupali Patil) आणि भाजपच्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनीही या शोमध्ये सहभाग घेतला. एकाच मंचावर तीन वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या तडफदार महिला नेत्या एकत्र आल्यावर काय होणार? ‘मसालेदार किचन कल्लाकार’च्या मंचावर जोरदार ‘कल्ला’ झाला. या शोमध्ये खमंग पदार्थांसोबतच अनेक किस्से, गोष्टी ऐकायला मिळाले. शिवाय अनेक मनोरंजक टास्क देखील पाहायला मिळाले.
शोमध्ये एक धम्माल टास्क रंगला. तर एका बॉक्समध्ये अनेक वस्तू, पदार्थ ठेवले गेले. या बॉक्समधून एक एक वस्तू, पदार्थ बाहेर काढायचा आणि ते पाहून तुम्हाला कोणत्या नेत्याची आठवण येते ते सांगायचं. किशोरी पेडणेकर यांना हा टास्क दिला गेला. बॉक्समधून पहिलाच पदार्थ बाहेर आला तो जिलेबी. जिलेबी पाहून किशोरी पेडणेकर यांना भाजप नेते गिरीश महाजन यांची आठवण आली. मग बॉक्समधून बाहेर आली सुरी आणि ती पाहिल्यावर किशोरी यांना आठवले संजय राऊत. बॉक्समध्ये भोंगा देखील होता. यावर भोंगा पाहिल्यावर त्यांना किरीट सोमय्या यांची आठवण येत असल्याचं सांगितलं.
झी मराठीने शेअर केलेला याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. या खास भागात किशोरी पेडणेकर यांच्या पतींनी देखील हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी लग्नाच्या आधी प्रेमात असतानाचे भन्नाट किस्से देखील ऐकवले.