"भैय्याशी हिंदीत बोलणारा मराठी माणूसच..." रिक्षाचालकांना मराठी सक्तीवरून अभिनेत्रीचे रोखठोक सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 11:27 IST2026-04-26T11:26:27+5:302026-04-26T11:27:00+5:30
येत्या महाराष्ट्र दिनापासून राज्यातील सर्व परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे अनिवार्य करण्यात आहे.

"भैय्याशी हिंदीत बोलणारा मराठी माणूसच..." रिक्षाचालकांना मराठी सक्तीवरून अभिनेत्रीचे रोखठोक सवाल
येत्या महाराष्ट्र दिनापासून राज्यातील सर्व परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे अनिवार्य करण्यात आहे. (Marathi Mandatory For Auto Taxi Driver) या निर्णयाविरोधात ऑटो-रिक्षा चालक मालक संघटनांचा रोष दिसून येत आहे. ४ मे पासून बाजारपेठा, रेल्वे स्थानके, बस डेपो, निवासी तसेच व्यापारी भागात दररोज निदर्शने करणार असल्याच्या संघटनांच्या पवित्र्यावर सर्व स्तरांतून प्रतिकिया उमटत आहेत. कलाविश्वातूनही या संपावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. 'कमळी' फेम अभिनेत्री सुषमा जयवंत हिने एक व्हिडीओ शेअर करत या निर्णयावर अत्यंत महत्त्वाचे आणि रोखठोक प्रश्न उपस्थित केले आहेत.
सुषमा जयवंतनं रिक्षा-टॅक्सी चालकांच्या मराठी भाषेच्या मुद्द्यावर भाष्य करताना थेट सरकार आणि सामान्य मराठी नागरिकांना धारेवर धरले. ती म्हणाली, "उत्तर प्रदेशातून येणाऱ्यांना मराठी येत नसेल तर त्यांना गाडी चालवू देणार नाही, हा निर्णय मान्य आहे आणि छानही आहे. पण माझा प्रश्न असा आहे की, जेव्हा हे लोक परवाना (License) घ्यायला येतात, तेव्हा सरकारकडून त्यांना तो दिलाच का जातो? तेव्हाच कुणी मराठीची सक्ती का करत नाही?".
केवळ सरकारवरच नाही, तर सुषमा हिने सामान्य मराठी माणसाच्या मानसिकतेवरही बोट ठेवले आहे. ती पुढे म्हणाली, "रस्त्यावर भाजी विकणाऱ्या भैयाला किंवा रिक्षावाल्याला 'तुम यहाँ आओगे क्या?', 'ये भाजी कितने में दी?' असं हिंदीत विचारणारा मराठी माणूसच आहे. आधी स्वतः मराठीत बोलायला शिका. आपण स्वतः मराठी बोलायची लाज बाळगतो आणि इतरांना मराठी बोलण्याची सक्ती करतो, यात काय लॉजिक आहे?".
सुषमा जयवंतनं शिक्षण पद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. "तुम्ही तुमच्या मुलांना किती मराठी माध्यमाच्या शाळेत शिकायला पाठवत आहात? आपण स्वतः बदलत नाही आणि फक्त दुसऱ्यांना 'तू चुकीचा आहेस' असं म्हणत बसतो. याच्याबद्दल विचार करा आणि याच्याबद्दल नक्की मत मांडा. मला नक्कीच चर्चा करायला आवडेल" असं तिनं म्हटलं.