संतोष जुवेकरला ट्रोल करणाऱ्यांना मराठमोळ्या अभिनेत्रीने सुनावलं; म्हणाली, "कलाकाराचं काम..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 10:14 IST2025-03-21T10:13:02+5:302025-03-21T10:14:48+5:30
संतोष जुवेकरला ट्रोल करणाऱ्यांवर आता मराठमोळी अभिनेत्री भडकली आहे

संतोष जुवेकरला ट्रोल करणाऱ्यांना मराठमोळ्या अभिनेत्रीने सुनावलं; म्हणाली, "कलाकाराचं काम..."
'छावा' या गाजत असलेल्या हिंदी सिनेमात मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरही (Santosh Juvekar) झळकला आहे. सिनेमानंतर संतोषने अनेक मुलाखती दिल्या. सुरुवातीला संतोषच्या कामाचं कौतुक झालं. मात्र त्याच्या मुलाखतींमुळे तो सतत ट्रोल व्हायला लागला. 'तुझा रोल किती तू बोलतो किती' असं म्हणत त्याच्यावर अनेक मीम्स बनले. तसंच त्याचं अक्षय खन्नाबद्दलचं वक्तव्यही चर्चेत होतं. संतोष जुवेकरला ट्रोल करणाऱ्यांवर आता मराठमोळी अभिनेत्री भडकली आहे. संतोषची बाजू घेत तुम्हाला बोलायला इतर मुद्दे नाहीत का असं तिने म्हटलं आहे.
'माझ्या नवऱ्याची बायको', 'ठरलं तर मग', 'बिग बॉस मराठी' आणि आता 'तू ही रे माझा मितवा' मध्ये दिसणारी अभिनेत्री रुचिरा जाधव (Ruchira Jadhav) सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. संतोष जुवेकरला ट्रोल करणाऱ्यांना तिने आता सुनावलं आहे. इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत ती म्हणाली, "मी बऱ्याच दिवसांपासून सोशल मीडियावर एक गोष्ट बघत आहे. मला खरंच कळत नाही आपला मराठी कलाकार एक छान बॉलिवूड सिनेमा करतो, छान अभिनय करतो मनापासून काम करतो, आपल्याला सिनेमा आवडतो, आपल्या फार जवळचा सिनेमा असतो. सिनेमानंतर नेहमीप्रमाणे अभिनेता मुलाखती देतो. त्याला प्रश्न विचारले जातात आणि तो त्याची चांगली उत्तरं देतो. एक नाही तर बऱ्याच मुलाखती द्याव्या लागतात. तेच प्रश्न, तेच उत्तरं असू शकतात. त्यामुळे तो त्याचं काम करतोय. तर सुरुवातीला त्याचं कामासाठी कौतुक होतं. मग काही दिवसांनी या कौतुकाचं ट्रोलमध्ये रुपांतर होतं. लोकांचं मनोरंजन म्हणून मीम्स वगरे ठिके पण आता अती व्हायला लागलं आहे. आता बघून कंटाळा यायला लागलाय. ते बघून असं वाटतं लोकांकडे इतका वेळ आहे? एका व्यक्तीबद्दल इतकं वाईट बोलावं? का ? कशासाठी? तो कलाकार असं काय एवढा वाईट बोललाय की इतक्या खालच्या पातळीला जाऊन बोलावं."
ती पुढे म्हणाली, "जगात काही इतर मुद्दे राहिलेच नाहीत का? जगात कशाला आपल्या आजूबाजूला, देनंदिन जीवनात बघा. अख्खी मुंबई खोदून ठेवली आहे. विकास विकास म्हणतोय आपण पण लोकसंख्या एवढी वाढतीये. रस्त्यावर इतके खड्डे आहेत. कधीपासून रस्ते, मेट्रो बनतच आहेत. त्याच्यासाठी आपण तडतोड करत आहोत. पण पुढच्या पिढीसाठी हे आहे, पण आताच्या त्रासाबद्दल का नाही बोलत कोणी? एखादा कलाकार त्याचं काम करतोय. ठिके काही गोष्टी होतात, बोलल्या जातात. तुम्ही कधी चुकत नाही का, फार सभ्य आहात का? तुम्ही स्वत:ला आरशात बघण्याची गरज आहे. या सर्व समाजसुधारकांना, कलाकारबद्दल बोलणाऱ्यांना मला सांगायचं आहे. तुमच्याकडे खूप वेळ आहे तर मुंबईतली वाढती लोकसंख्या आणि प्रदूषण या दोन गोष्टींबद्दल बोला. तुमच्या असामान्य बुद्धीने तुम्ही किती प्रकाश पाडू शकता हे मलाही बघायचंय. असलेल्या वेळेचा सदुपयोग करा. त्यातून काहीतरी चांगलं होईल असं मला वाटतं."