"लोकांना माहितही नाहीये, खूप वाईट"; मराठी अभिनेत्याने 'दशावतार' पाहून शेअर केला व्हिडीओ, व्यक्त केली खंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 16:47 IST2025-09-16T16:45:17+5:302025-09-16T16:47:51+5:30
प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने दशावतार सिनेमा बघून आल्यावर मनातील खंत व्यक्त केली. त्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे

"लोकांना माहितही नाहीये, खूप वाईट"; मराठी अभिनेत्याने 'दशावतार' पाहून शेअर केला व्हिडीओ, व्यक्त केली खंत
'दशावतार' सिनेमाची सध्या चांगलीच चर्चा आहे. सिनेमाने पाच दिवसात ४ कोटींहून जास्तीची कमाई केलीय. परंतु याच सिनेमाबद्दल एका मराठी अभिनेत्याने खंत व्यक्त केलीय. 'शिवा' मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता तेजस महाजनने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय. तेजस लिहितो की, ''आज पहिल्यांदा एका रिलच्या माध्यमातून माझं मत मांडण्याचा प्रयत्न मी करतोय. दोन-तीन दिवसांपूर्वी मी एक सुंदर चित्रपट बघून आलो. दशावतार. वॉव. जस्ट वॉव. दिलीप सर यू आर ग्रेट. संपूर्ण टीमला हॅट्स ऑफ. आणि तुमचं मनापासून अभिनंदन.''
''मी गेल्या दोन-तीन दिवसांपासून काही बातम्या वाचत होतो की पहिल्या दिवशीचं अमूक अमूक कलेक्शन. दुसऱ्या दिवशीचं अमूक अमूक कलेक्शन. म्हणून मी एक खारीचा वाटा म्हणून माझ्या ओळखीच्या सगळ्यांना सांगत होतो की, वेळ मिळेल तेव्हा दशावतार नक्की बघून या.''
''अशाच एका व्यक्तीला मी जेव्हा बोललो की, तू दशावतार पाहिलायेस का? तेव्हा तो मला म्हणतो, 'काय रे! कुठे लागणारेय'. मी म्हटलं, 'अरे फिल्म आलीये नवीन भावा, खूप सुंदर आहे. जा बघून ये'. तेव्हा तो म्हणाला की, 'हो जाईन जाईन' . त्याने लगेच त्याच्या मित्राला सांगितलं की, 'उद्या आपल्याला दशावतार बघायला जायचंय बरं का.' तेव्हा तो दुसरा मित्र म्हटला, 'काय आहे हे. काय नवीन सिनेमा वगैरे आलाय का मराठीत?' खेदजनक. खूप खूप खूप वाईट.''
''म्हणजे एखादा दक्षिणेतला सिनेमा येतोय. एखादी बॉलिवूडची फिल्म रिलीज होतेय, तेव्हा सगळ्यांना उत्सुकता असते. आणि अशातच मराठी सिनेसृष्टीत इतका सुंदर आणि बेंचमार्क ठरु शकेल असा सिनेमा आलाय, आणि लोकांना माहितही नाही. पाहणं तर दूर, माहितही नाही. माझ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या तरुण मंडळींना, सर्वांना हे सांगायचंय की, प्लीज या vertical चौकटीतून बाहेर पडा. आणि १५२ मिनिटाची कलाकृती त्या horizontal पडद्यावर बघा. आणि एका ८१ वर्षांच्या तरुण माणसाला स्क्रीनवर धुमाकुळ घालताना बघा. माझ्या नॉन महाराष्ट्रीयन मित्रांना माझं हेच सांगणं आहे की, तुम्ही दशावतार नावाची जादू बघा. प्लीज प्लीज प्लीज.'' अशाप्रकारे तेजसचा रिल चर्चेत आहे.