"संसार या शब्दाचा अर्थ तुझ्यामुळे कळतोय...", 'छावा' फेम अभिनेत्याची पत्नीच्या वाढदिवशी रोमॅन्टिक पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 13:10 IST2025-05-14T13:06:57+5:302025-05-14T13:10:45+5:30
अभिनेता शुभंकर एकबोटेची पत्नीच्या वाढदिवशी रोमॅन्टिक पोस्ट, म्हणाला...

"संसार या शब्दाचा अर्थ तुझ्यामुळे कळतोय...", 'छावा' फेम अभिनेत्याची पत्नीच्या वाढदिवशी रोमॅन्टिक पोस्ट
Shubhankar Ekbote Post: मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणजेच अभिनेत्री अमृता बने (Amruta Bane) आणि शुभंकर एकबोटेकडे (Shubhankar Ekkbote) पाहिलं जातं. त्यांचा चाहतावर्ग देखील मोठा आहे. गेल्यावर्षी २१ एप्रिलला त्यांनी लग्नगाठ बांधली. त्यांच्या सुखी संसाराला १ वर्ष पूर्ण झाला आहे. दरम्यान, शुभंकर आणि अमृताबद्दल जाणून घेण्यास त्यांच्या चाहत्यांना प्रचंड उत्सुकता असते. सध्या सोशल मीडियावर या जोडीची चांगलीच चर्चा होताना दिसते. याचं कारण म्हणजे अभिनेत्री अमृता बनेचा वाढदिवस. अभिनेत्री अमृता बनेच्या वाढदिवसानिमित्त शुभंकरने शेअर केलेली पोस्ट चाहत्यांचं लक्ष वेधते आहे. शुभंकरने सोशल मीडियावर त्याचे आणि अमृताचे आठणीतील क्षण शेअर केले आहेत.
शुभंकर एकबोटेने पत्नी अमृताच्या वाढदिवशी भलीमोठी पोस्ट लिहून तिच्याविषयी प्रेम व्यक्त केलं आहे. या पोस्टमध्ये आपल्या बायकोचं कौतुक करत अभिनेत्याने लिहिलंय, "प्रिय जोडीदार...! खरंतर या क्षणी इतक्या सगळ्या भावना एकमेकांवर आदळतायत कि त्यातल्या नेमक्या कोणत्या भावनेला न्याय देऊ शब्दात कळत नाहीए. तू माझ्या आयुष्यात आलीस एक सहकारी म्हणून मग मैत्रीण मग प्रेयसी मग बायको आणि आता आयुष्यभराची सखी माझ्या अशु आईसारखीच एकदम. या नात्यांच्या प्रत्येक layer मध्ये तू मला मी तुला रोज नव्याने समजत चाललोय आणि त्यामुळे नकळतपणे आपण आयुष्याचा आपला अर्थ आपलं जग शोधत चाललोय."
यानंतर अभिनेत्याने लिहिलंय, "आनंद स्वप्न यश हे सगळं कायम व्यक्तिनिष्ठ असतं असं मला वाटतं , मी-तू पासून आपण या प्रवासात तुझी सगळी सुखं , आनंद , स्वप्न सगळं माझं होऊन गेलंय आणि तसंच माझं सगळं तुझं, कदाचित हेच असावं मोठे लोक म्हणतात तो संसार... या शब्दाचा रोज नवीन अर्थ मला तुझ्यामुळे तुझ्या रूपाने कळतोय आणि त्यामुळे मी माझ्या अजून जवळ जात चाललोय. तुझी सगळी स्वप्नं , इच्छा, आकांक्षा सगळं पूर्ण होवो तुला भरपूर यश मिळो भरपूर आनंद मिळो आणि तुझ्या या प्रवासात प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यामध्ये माझा खारीचा तरी वाटा असुदे हीच प्रार्थना...". अशी पोस्ट अभिनेत्याने लिहिली आहे.
अलिकडेच शुभंकर एकबोटे छावा चित्रपटामुळे चांगलाच प्रसिद्धीझोतात आला होता. या चित्रपटातील त्याच्या कामाचं सगळीकडे कौतुक झालं. याशिवाय कन्यादान' या मालिकेत अमृता बने आणि शुभंकर एकबोटे यांनी काम केलं होतं. मालिकेच्या सेटवर अमृता आणि शुभंकरची ओळख झाली होती. तर मालिकेतही त्यांनी एकत्र स्क्रीन शेअर केलं होती. त्यांनी साकारलेली वृंदा आणि राणा ही भूमिका खूप गाजली. या मालिकेदरम्यान त्यांची मैत्री झाली आणि नंतर ते प्रेमात पडले. पुढे जाऊन त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला.