"कबुतर हा कुठल्या एका धर्माचा पक्षी वाटत असेल तर...", दादर कबुतरखान्याबद्दल मराठी अभिनेत्याने शेअर केलेली पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 16:59 IST2025-08-03T16:51:46+5:302025-08-03T16:59:38+5:30
दादर कबूतरखान्याची अवस्था पाहून अभिनेत्याची पोस्ट चर्चेत, म्हणाला "लोकांना अक्कल..."

"कबुतर हा कुठल्या एका धर्माचा पक्षी वाटत असेल तर...", दादर कबुतरखान्याबद्दल मराठी अभिनेत्याने शेअर केलेली पोस्ट चर्चेत
Abhijeet Kelkar: सध्या सर्वत्र मुंबईतील दादर पश्चिम येथील कबुतरखान्याचा मुद्दा चर्चेचा विषय ठरला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकारने मुंबईतील कबुतरखाने हटवण्याचे निर्देश महापालिकेला दिले. त्यानंतर या कबुतरखान्यावर पालिकेने कारवाई केली आहे. काल शनिवारी संध्याकाळपासून पालिकेने ताडपत्री लावून संपूर्ण कबुतरखाना बंद केला. या कारवाईचे पडसाद आता राजकीय वर्तुळात देखील उमटताना दिसत आहे. अशातच याप्रकरणी मराठी अभिनेत्याने सोशल मीडिया पोस्ट शेअर केलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे. हा अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून अभिजीत केळकर आहे.
अभिजीत केळकर हा त्याच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो. वेगवेगळ्या मुद्द्यांवर तो आपलं मत मांडताना दिसतो. नुकताच त्याने दादरच्या कबूतर खान्याचा व्हिडीओ शेअर करत प्रशासनाला पाठिंबा दिला आहे. दरम्यान, या व्हिडीओला कॅप्शन देत त्याने लिहिलंय की, "काहीच दिवसांपूर्वी दादरच्या कबूतरखान्याचा हा व्हिडिओ, हा व्हिडिओ शूट करतानाच माझा भयंकर संताप झाला होता... भूतदया वगैरे सगळं मलाही आहेच, मलाही प्राणी, पक्षी अतिशय प्रिय आहेत पण कबूतर ह्या पक्षांमुळे श्वसनाचे बरे न होणारे गंभीर विकार, आजार होतात हे सिद्ध होऊनही, मुंबई महानगरपालिकेने वारंवार सचेत करूनही, सूचना देऊनही लोकांना अक्कल येत नाही."
पुढे अभिनेत्याने लिहिलंय, "कबुतर हा पक्षी कुठल्या एका धर्माचा पक्षी त्यांना वाटत असेल तर तो त्यांनी आपल्या घराला जाळ्या लावून, घराच्या आत खुशाल पाळावा... आता स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी कुठल्याही पक्षाने, निदान ह्याचे तरी धार्मिक राजकारण न करता, @my_bmc @mybmchealth ने जी ताडपत्री, शेड घालून, कारवाई केली आहे त्यामागे खंबीरपणे उभे रहावे ही कळकळीची विनंती...", असं म्हणत अभिनेत्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
दादरमधील प्रसिद्ध कबुतरखान्याच्या परिसरात कबुतरांच्या उच्छादामुळे दुकानदार, ग्राहक यांच्यासह स्थानिक नागरिकही अक्षरश: बेजार झाले होते. येथील कबुतरे दररोज अंदाजे अर्धा टन धान्य फस्त करत असून, स्थानिकांचे आरोग्य आणि स्वच्छतेलाही धोका निर्माण करत असल्याचा प्रकार समोर आले होते.