'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चा नवा सीझन कधी सुरु होणार? कलाकारांनीच तारीख केली जाहीर
By देवेंद्र जाधव | Updated: December 8, 2025 16:23 IST2025-12-08T16:19:41+5:302025-12-08T16:23:13+5:30
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा सर्वांचा लाडका शो. या शोचे नवीन एपिसोड बंद होते. पण आता या तारखेपासून हास्यजत्रा पुन्हा सुरु होणार आहे

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चा नवा सीझन कधी सुरु होणार? कलाकारांनीच तारीख केली जाहीर
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा सर्वांचा लाडका शो. गेली अनेक वर्ष हा शो प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमाने कोरोना काळात जेव्हा सामान्य माणसांच्या आयुष्यात दुःखाचं सावट होतं तेव्हा प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणलं. गेल्या काही दिवसांपासून मात्र 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चे नवीन एपिसोड प्रेक्षकांना पाहायला मिळत नाहीयेत. त्यामुळे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चे फ्रेश एपिसोड कधी बघायला मिळणार, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. अखेर याचं उत्तर समोर आलं आहे.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चा नवीन सीझन कधी सुरु होणार
सोनी मराठीने त्यांच्या सोशल मीडियावर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोत दिसतं की 'पावली अवली कोहली' आणि 'अवली लवली कोहली' हे दोघे कॅमेरासमोर उभे असतात. मागे समीर चौघुले त्यांना 'लोक वाट बघून थकले आता तरी सांगा', असे हातवारे करताना दिसतात. पुढे मग 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या नवीन पर्वाची तारीख समोर येते. नवीन वर्षात अर्थात ५ जानेवारी २०२६ पासून सोमवार-मंगळवार रात्री ९ वाजता सोनी मराठीवर 'हास्यजत्रा' सुरु होणार आहे. त्यामुळे सर्वांना नवीन वर्षात हास्याची मेजवानी बघायला मिळेल यात शंका नाही.
ओंकार भोजने असणार की नसणार?
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चं याआधीचं पर्व जेव्हा संपलं तेव्हा ओंकार भोजनेने पुन्हा 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये कमबॅक केलेलं दिसलं. ओंकारची भूमिका असलेले दोन नवीन स्कीटही पाहण्यात आले. परंतु त्यानंतर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चे नवीन एपिसोड येणं बंद झालं. त्यामुळे ५ जानेवारीपासून सुरु होणाऱ्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये ओंकार भोजने पुन्हा दिसणार का, असा सर्वांच्या मनात प्रश्न आहे. 'हास्यजत्रा' पुन्हा सुरु झाल्यावरच या प्रश्नाचं उत्तर कळेल. ं