'तू सेलिब्रिटी नाहीस'; एकेकाळी किकू शारदाला 'नच बलिये'मधून दाखवला होता बाहेरचा रस्ता
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 15:03 IST2022-08-03T15:02:03+5:302022-08-03T15:03:00+5:30
Kiku sharda: आजच्या घडीला त्याचे असंख्य चाहते आहेत. मात्र, एक काळ असा होता ज्यावेळी उत्तम अभिनय येत असतानाही केवळ सेलिब्रिटीप्रमाणे दिसत नसल्यामुळे त्याला दोन रिअॅलिटी शोमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता.

'तू सेलिब्रिटी नाहीस'; एकेकाळी किकू शारदाला 'नच बलिये'मधून दाखवला होता बाहेरचा रस्ता
'द कपिल शर्मा' ( the kapil sharma show) या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला लोकप्रिय विनोदवीर म्हणजे कीकू शारदा (kiku sharda). या शोमध्ये नर्सची भूमिका साकारुन त्याने तुफान लोकप्रियता मिळवली. आजच्या घडीला त्याचे असंख्य चाहते आहेत. मात्र, एक काळ असा होता ज्यावेळी उत्तम अभिनय येत असतानाही केवळ सेलिब्रिटीप्रमाणे दिसत नसल्यामुळे त्याला दोन रिअॅलिटी शोमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. एका मुलाखतीत त्याने याविषयी भाष्य केलं.
अलिकडेच कीकूने पिंकव्हिलाला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये स्ट्रगल काळात कसं आपल्याला रिजेक्ट करण्यात आलं हे सांगितलं. "कपिल शर्माचा भाग झाल्यानंतर माझ्या आयुष्यातील अनेक गोष्टी बदलल्या. मी पूर्वी एक चांगला अभिनेता होतो हे मी मान्य करतो. पण, आता मी अभिनेता असण्यासोबतच फेमस झालोय. सुरुवातीला मला झलक दिखला जा आणि नच बलिये या शोमध्ये सहभागी व्हायचं होतं. पण मला कोणीही त्या शोमध्ये घेतलं नाही", असं कीकू म्हणाला.
पुढे तो म्हणतो, "का? तर म्हणे तुम्ही चांगले अभिनेता तर आहात पण तुम्ही इतकेही मोठे झाला नाहीत की ज्यामुळे तुम्ही सेलिब्रिटी म्हणून ओळखले जाल. तुम्ही फक्त अभिनेता आहात असं म्हणून मला या शोमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. त्यावेळी मी विचार केला फक्त अभिनेता होणं पुरेसं नाही तर सेलिब्रिटी असणं गरजेचं आहे. त्यानंतर मी कपिल शर्मा शोमध्ये काम करायला सुरुवात केली आणि अवघ्या ४-५ महिन्यामध्येच मला नच बलियेच्या टीमने फोन केला. आणि, मी या शोचा भाग झालो."
दरम्यान, २०१३ मध्ये कीकू शारदा 'नच बलिये 6' मध्ये झळकला. या शोमध्ये त्याने पत्नी प्रियांकासोबत भाग घेतला होता. त्यानंतर तो २०१४ मध्ये 'झलक दिखला जा 7' मध्येही सहभागी झाला.