India's Got Talent 11: ग्रँड फिनालेमध्ये 'या' टीमने मारली बाजी; बक्षीस म्हणून मिळाले तब्बल १५ लाख
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 10:56 IST2026-01-05T10:51:51+5:302026-01-05T10:56:31+5:30
टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध 'इंडियाज गॉट टॅलेंट'च्या ११ व्या पर्वाचा ग्रँड फिनाले सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यात कोणी बाजी मारली, जाणून घ्या

India's Got Talent 11: ग्रँड फिनालेमध्ये 'या' टीमने मारली बाजी; बक्षीस म्हणून मिळाले तब्बल १५ लाख
टीव्हीवरील अत्यंत लोकप्रिय रिअॅलिटी शो 'इंडियाज गॉट टॅलेंट'च्या ११ व्या पर्वाचा (India's Got Talent 11) दिमाखदार ग्रँड फिनाले रविवारी, ४ जानेवारी २०२६ रोजी पार पडला. गेल्या तीन महिन्यांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या या शोला अखेर आपला विजेता मिळाला आहे. कोलकात्याच्या प्रसिद्ध 'अमेजिंग अप्सरास' (Amazing Apsaras) या महिला डान्स ग्रुपने आपल्या अप्रतिम सादरीकरणाने सर्वांना मागे टाकत विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे.
विजेत्या ठरलेल्या 'अमेजिंग अप्सरास' ग्रुपला 'इंडियाज गॉट टॅलेंट ११'ची मानाची ट्रॉफी आणि १५ लाख रुपयांचे रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले. यासोबतच त्यांना अनेक आकर्षक स्पॉन्सर्ड गिफ्ट्सही मिळाले आहेत. या ग्रुपने संपूर्ण सीझनमध्ये आपल्या शास्त्रीय आणि आधुनिक नृत्याच्या जोरावर परीक्षक आणि प्रेक्षकांची मने जिंकली होती. दरम्यान, सिक्कीमचा प्रसिद्ध म्युझिक बँड 'साउंड ऑफ सोल्स' (Sound of Souls) या स्पर्धेत दुसऱ्या स्थानावर म्हणजेच 'रनर-अप' राहिला.
या ग्रँड फिनालेमध्ये बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर, मास्टर शेफ रणवीर ब्रार आणि विकास खन्ना यांनी विशेष पाहुणे म्हणून हजेरी लावली होती. परीक्षक नवजोत सिंह सिद्धू, मलायका अरोरा आणि शान यांनीही स्पर्धकांच्या सादरीकरणाला दाद दिली. फिनालेमध्ये टॉप ७ स्पर्धकांमध्ये - वी कंपनी, आकाश आणि अभिषेक, नेपाल टायगर्स, क्लासिक क्वीन्स, अमेजिंग अप्सरास, विक्की क्रिश आणि कॅलीबॉयज - यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. मात्र या सगळ्यात अमेजिंग अप्सरासने मारली.
सोनी टीव्हीवर प्रसारित झालेल्या या पर्वाने 'अलग क्या है' या थीमखाली अनेक नवनवीन टॅलेंट जगासमोर आणले. 'अमेजिंग अप्सरास'च्या विजयावर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत असून, त्यांच्या मेहनतीला मिळालेले हे फळ असल्याचे चाहते म्हणत आहेत. तुम्हाला सोनी लिव्ह ॲपवर हा महाअंतिम सोहळा पुन्हा पाहता येईल.