'बिग बॉस मराठी ६'मध्ये दिसणार गौतमी पाटील? म्हणाली, "शो खूप छान आहे पण..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 09:17 IST2025-12-17T09:14:58+5:302025-12-17T09:17:25+5:30
गौतमी पाटीलने सांगितलं खरं कारण

'बिग बॉस मराठी ६'मध्ये दिसणार गौतमी पाटील? म्हणाली, "शो खूप छान आहे पण..."
Gautami Patil in Bigg Boss Marathi 6: सबसे कातील गौतमी पाटील...! डान्सर गौतमी पाटीलची महाराष्ट्रात आजही खूप क्रेझ आहे. गावोगावी तिचे कार्यक्रम हाऊसफुल असतात. गौतमी स्टेजवर येते तेव्हा लहान मुलं, महिला, पुरुष सगळेच थिरकतात. गौतमीची सगळ्यांमध्ये चांगलीच हवा आहे. महाराष्ट्राची सेन्सेशन गौतमी पाटील 'बिग बॉस'मध्ये येणार अशी चर्चा काही दिवसांपासून सुरु आहे. गेल्या सीझनवेळीही ही चर्चा होती. आता नुकतंच गौतमीने बिग बॉसमध्ये जाऊ शकत नाही अशी प्रतिक्रिया दिली. याचं मोठं कारण तिने सांगितलं आहे.
गौतमीने 'बिग बॉस'ला दिला नकार
गौतमी पाटीलने 'बिग बॉस' या रिएलिटी शोची स्तुती केली. पण ती स्वत: शोमध्ये जाऊ शकत नाही. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत तिने यामागचं कारण सांगितलं. ती म्हणाली, "मला बोलवलं होतं. अभिजीत दादाच्या सीझनवेळीच बोलवलं होतं. बिग बॉस खूप छान आहे. आज बिग बॉसमध्ये गेलं तर लोकांचं करिअर होतंच. माझं न जाण्याचं कारण वेगळं आहे. मी जास्त दिवस आईला सोडून राहू शकत नाही. मी तीन चार दिवसांपेक्षा जास्त आईशिवाय राहत नाही. तिला मी सोडू शकत नाही. हेच माझं कारण आहे. पण बिग बॉस खरंच बेस्ट आहे. तिथे गेलं की लोकप्रियता मिळते."
गौतमी पाटील सध्या एका गाण्यामुळेही चर्चेत आहे. गायक अभिजीत सावंतने 'रुपेरी वाळूत' हे गाजलेलं मराठी गाणं रिक्रिएट केलं. या अल्बममध्ये त्याच्यासोबत गौतमी पाटील झळकली. सध्या दोघांच्या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या गौतमीला अनेक मराठी सिनेमांमध्येही डान्स नंबर करण्याची संधी मिळत आहे. एकूणच तिचं करिअर आता सुसाट आहे.
तर दुसरीकडे ११ जानेवारीपासून बिग बॉस मराठी सीझन ६ सुरु होत आहे. रितेश देशमुखच यावेळी शो होस्ट करणार आहे. गेल्या सीझनमध्ये सूरज चव्हाण विजेता झाला होता. आता यंदा कोणकोणते स्पर्धक घरात प्रवेश करणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.