धक्कादायक! 'बिग बॉस' फेम अभिनेत्री हिट अँड रन प्रकरणात अडकली, भरधाव गाडीची महिलेला धडक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 11:46 IST2025-10-25T11:45:33+5:302025-10-25T11:46:55+5:30
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीच्या गाडीने महिलेला गंभीर जखमी झाली. पण अभिनेत्री मदत न करता अभिनेत्री पळून गेली. काय घडलं नेमकं?

धक्कादायक! 'बिग बॉस' फेम अभिनेत्री हिट अँड रन प्रकरणात अडकली, भरधाव गाडीची महिलेला धडक
मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आणि 'बिग बॉस' फेम दिव्या सुरेश हिच्यावर बंगळूरुमध्ये एका ज्येष्ठ महिलेला आपल्या गाडीने धडक देऊन गंभीर जखमी केल्याचा आरोप करण्यात आहे. ही घटना घडल्यावर दिव्याने घटनास्थळावरुन पळ काढल्याचं सांगण्यात येत आहे. या हिट-अँड-रन प्रकरणाने खळबळ उडाली असून, दिव्या सुरेशविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिव्या सुरेश २३ ऑक्टोबर २०२५ रोजी पहाटे तिच्या गाडीतून प्रवास करत होती. बंगळूरुच्या बायटरायणपुरा परिसरामध्ये तिने एका ५० वर्षीय ज्येष्ठ महिलेला जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरात होती की, त्या महिलेला गंभीर दुखापत झाली आणि तिचा पाय फ्रॅक्चर झाल्याची माहिती समोर येत आहे. ही महिला रस्त्यावरून पायी जात असताना हा अपघात झाला. धडक दिल्यानंतर मदत करण्याऐवजी दिव्या सुरेशने गाडी न थांबवता घटनास्थळावरून लगेच पळ काढला.
ही घटना घडल्यानंतर जखमी महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर एका प्रत्यक्षदर्शीने पोलिसांना संपर्क साधला आणि दिव्या सुरेशच्या कारचा नंबर नोंदवला. पोलिसांनी कार नंबरच्या आधारे तपास केला असता, ती गाडी अभिनेत्री दिव्या सुरेशच्या नावावर असल्याचा खुलासा झाला. पोलिसांनी कलम २७९ (निष्काळजीपणे वाहन चालवणे) आणि ३३८ (इतरांच्या जीवाला धोका निर्माण करून गंभीर दुखापत करणे) अंतर्गत दिव्या सुरेशविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून अभिनेत्री दिव्या सुरेशला लवकरच चौकशीसाठी बोलावलं जाण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे कन्नड चित्रपटसृष्टीत आणि दिव्याच्या चाहत्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.