Bigg Boss 19: 'या' स्पर्धकाचा 'बिग बॉस'मधील प्रवास संपला, सर्वांना चांगलाच धक्का बसला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 12:55 IST2025-09-27T12:55:09+5:302025-09-27T12:55:58+5:30
'बिग बॉस १९' मधून धक्कादायक एविक्शन झालं आहे. त्यामुळे घरातीस सदस्य आणि प्रेक्षकांना चांगलाच धक्का बसला आहे

Bigg Boss 19: 'या' स्पर्धकाचा 'बिग बॉस'मधील प्रवास संपला, सर्वांना चांगलाच धक्का बसला
टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय रिअॅलिटी शो म्हणजे 'बिग बॉस १९' (Bigg Boss 19). या शोमध्ये या आठवड्यातील 'वीकेंड का वार' अत्यंत खास ठरला. या एपिसोडमध्ये होस्ट सलमान खानने (Salman Khan) दोन स्पर्धकांना त्यांच्या उद्धट वागण्याबद्दल चांगलंच फटकारलं, तसंच बिग बॉसची माजी स्पर्धक गौहर खानची एन्ट्री झाली, याशिवाय एका स्पर्धकाला घराबाहेर पडावं लागलं. जाणून घ्या सविस्तर
हा स्पर्धक गेला 'बिग बॉस १९'मधून बाहेर
या आठवड्यात घराबाहेर होण्यासाठी नीलम, आवेज, प्रणित, अशनूर, मृदुल आणि गौरव असे सहा सदस्य नॉमिनेट झाले होते. या सर्वांमध्ये, सर्वात कमी मते मिळाल्याने आवेज दरबारला (Avez Darbar) घराबाहेर पडावं लागलं. आवेजच्या या एव्हिक्शनमुळे प्रेक्षक आणि घरातील सदस्यांना मोठा धक्का बसला. अनेकांना वाटत होतं की, प्रणित मोरे घराबाहेर जाईल. पण महाराष्ट्रातील जनतेचा प्रणितला फुल्ल सपोर्ट असल्याने तो या आठवड्यात जास्त वोट मिळाल्याने सेफ झाला आहे. याविषयी अधिकृत घोषणा आजच्या भागात होईल
गौहर खानची एंट्री
यावेळी घरात बिग बॉसची माजी विजेती गौहर खानने (Gauhar Khan) एंट्री घेतली. गौहरने घरातील सदस्यांची भेट घेतली आणि काही सदस्यांना त्यांच्या बोलण्याच्या आणि खेळण्याच्या पद्धतीबद्दल सल्ला दिला. तिने घरातील सदस्यांना, बोलताना योग्य शब्दांचा वापर करण्याची आणि स्वतःची मर्यादा ओळखण्याची सूचना केली. गौहरने आवेज दरबारला त्याचा खेळ योग्यरित्या न खेळल्याबद्दल, आणि आवश्यक तिथे आवाज न उठवण्याबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच, तिने अमाल मलिकला (Amaal Mallik) भांडणादरम्यान शब्दांचा वापर जपून करण्याचा सल्ला दिला.
सलमान खानची अमाल आणि बसीरला सक्त ताकीद
शोचा होस्ट सलमान खानने बसीर अली (Baseer Ali) आणि अमाल मलिक यांना त्यांच्या वागणुकीबद्दल चांगलंच फटकारलं. प्रणितसोबत झालेल्या भांडणादरम्यान या दोघांनी सर्व मर्यादा ओलांडल्याचे सलमानने सांगितले.
सलमान खान म्हणाला, “तुम्ही दोघांनी प्रणितशी भांडताना सर्व मर्यादा ओलांडल्या. 'गावातून आला आहेस' म्हणजे काय? तुम्ही कुठून आला आहात? तुमचे वडील, पणजोबा कुठून आले होते? सगळेजण आपापल्या टॅलेंटमुळे इथे येतात.” यावेळी अमाल मलिकने भांडणाच्या वेळी प्रणितला वारंवार ढकलून भडकवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल सलमानने त्याला सक्त ताकीद दिली. "तो 'मला हात लावू नको' असं बोलत होता, पण तरीही तू त्याच्या अंगाला हात लावून त्याला भडकवलंस ," असं सलमानने अमालला सुनावले. या आठवड्यात आवेज घरातून बाहेर पडल्यानंतर आता हा खेळ कोणती नवी वळणं घेतो, हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे.