"पुढचा सीझन शक्य नाही...", Bigg Boss 18 finale वेळी सलमानने स्टेजवरच केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 11:03 IST2025-01-20T11:02:55+5:302025-01-20T11:03:32+5:30

सलमान नेमकं काय म्हणाला?

bigg boss 18 season finale host salman khan reveals he wont be there for next season | "पुढचा सीझन शक्य नाही...", Bigg Boss 18 finale वेळी सलमानने स्टेजवरच केला खुलासा

"पुढचा सीझन शक्य नाही...", Bigg Boss 18 finale वेळी सलमानने स्टेजवरच केला खुलासा

बिग बॉस १८ (Bigg Boss 18) चा काल ग्रँड फिनाले पार पडला. ६ ऑक्टोबर ते १९ जानेवारी असे १०७ दिवस सीझन चालला. अभिनेता करणवीर मेहराने (Karanveer Mehra) यंदाची बिग बॉसची ट्रॉफी उचलली. विवियन डिसेना रनर अप ठरला. सलमान खाननेच (Salman Khan) यंदाचाही सीझनचं होस्टिंग केलं होतं. गेल्या १४ वर्षांपासून तो बिग बॉस होस्ट करत आहे. त्याच्या होस्टिंगची चाहत्यांमध्ये एक वेगळीच क्रेझ आहे. दरम्यान आता पुढचा सीझन सलमान होस्ट करणार नाही असा खुलासा केला आहे.

बिग बॉस १८ च्या ग्रँड फिनालेमध्ये सलमान खानने धक्कादायक खुलासा केला ज्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. बिग बॉस १९ हा पुढचा सीझन होस्ट करणार नाही असं तो म्हणाला. सलमान मस्करीत म्हणाला, "फायनलिस्टला असं वाटत असेल इथपर्यंत आलात म्हणजे आता कोण हरलं कोण जिंकलं काही फरक पडत नाही. पण ते असं नसतं." हे ऐकून सगळेच हसायला लागले. तो पुढे म्हणाला, "बिग बॉसच्या घरात प्रत्येक दिवस अवघड असतो. टॉप ६ पर्यंत पोहोचलेल्या सर्वांचाच मला अभिमान आहे. मी सुद्धा शोचे १५-१६ सीझन होस्ट केले आहेत. पण आता पुढचा सीझन करणं शक्य नाही."

तो पुढे म्हणाला, "मी खूप खूश आहे. आज स्टेजवर येण्याचा माझा शेवटचा दिवस आहे. विजेत्याचा हात उचलण्याची आणि काम पूर्ण करण्याची मी वाट पाहत आहे." सलमानच्या या खुलाश्यानंतर चाहते निराश झाले आहेत. आता हे सलमान मस्करीत म्हटला की खरोखरंच यावरही शंकाच आहे.

गेला काही काळ सलमानसाठी फारच कठीण सुरु आहे. तब्येतीच्या तक्रारी आणि नंतर लॉरेन्स बिश्नोईकडून सततच्या धमक्या यामुळे सलमान आणि त्याचं कुटुंब चिंतेत आहे. चाहतेही सलमानसाठी काळजी व्यक्त करत आहे. तसंच सलमानच्या आगामी 'सिकंदर'ची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

Web Title: bigg boss 18 season finale host salman khan reveals he wont be there for next season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.