"मला श्वास घ्यायला त्रास होतोय अन्..."; दुसऱ्यांदा गरोदर असणाऱ्या भारती सिंगची झाली अशी अवस्था
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 15:41 IST2025-10-20T15:38:20+5:302025-10-20T15:41:12+5:30
भारती सिंग सध्या दुसऱ्यांदा गरोदर आहे. त्यानिमित्त तिने तिची शारीरिक अवस्थेबद्दल मोठा खुलासा केला आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना काळजी वाटली आहे

"मला श्वास घ्यायला त्रास होतोय अन्..."; दुसऱ्यांदा गरोदर असणाऱ्या भारती सिंगची झाली अशी अवस्था
कॉमेडी क्वीन भारती सिंग (Bharti Singh) सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते. काहीच दिवसांपूर्वी भारतीने ती दुसऱ्यांदा गरोदर असल्याचं सांगितलं. दिवाळीच्या धामधुमीत ती तिच्या कुटुंबासोबत आनंदाचे क्षण अनुभवत असली तरी, दुसऱ्यांदा आई होण्याच्या प्रवासात तिला काही समस्यांचा सामना करावा लागत आहे. नुकत्याच एका व्लॉगमध्ये भारती सिंगने याबद्दल खुलासा केला.
खरेदी करताना भारतीला लागली धाप
भारती सिंगने तिच्या अधिकृत यू-ट्यूब चॅनलवर एक व्लॉग शेअर केला आहे, ज्यात तिने दिवाळीच्या तयारीची झलक चाहत्यांना दाखवली. घरातील सजावट, लाईटिंग्स आणि दिव्यांची तयारी करताना ती खूप उत्साही दिसत होती. मात्र, खरेदी करताना आणि कामात व्यस्त असताना तिला श्वास घेण्यास त्रास होत असल्याचं तिने सांगितलं. भारतीने चाहत्यांना विचारलं की, दुसऱ्या प्रेग्नन्सीमध्ये असं होणं ही सामान्य गोष्ट आहे का? दुसऱ्या मुलाची अपेक्षा करताना तिला कसं वाटतंय, हेदेखील तिने सांगितलं.
मुलीची आहे अपेक्षा
भारतीने व्लॉगमध्ये पुढे सांगितले, "माझा विश्वास बसत नाहीये की, पुढील दिवाळीपर्यंत माझ्या घरी अजून एक बाळ असेल. मी आशा करतेय की, यावेळी मुलगी व्हावी. अर्थात, बाळ सुखरूप आणि सुरक्षित असेल तर मी आनंदीच राहीन. पण खरं सांगायचं तर, मला मुलगी हवी आहे. कल्पना करा... गोला (तिचा मुलगा) शेरवानीमध्ये आणि माझी मुलगी सुंदर लहंगा किंवा पंजाबी सूटमध्ये किती सुंदर दिसतील."
भारतीने सांगितलं की, ती या नवीन पाहुण्याच्या स्वागतासाठी खूप उत्सुक आहे. यावेळी खरेदीसाठी बाहेर पडल्यावर तिला भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीने तिचं अभिनंदन केलं. ज्यामुळे ती भारावून गेली. भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिम्बाचिया यांनी काही दिवसांपूर्वीच एका खास पद्धतीने त्यांच्या दुसऱ्या प्रेग्नन्सीची घोषणा केली होती.