समृद्धी केळकरने केलं अक्षय केळकरचं केळवण, फोटो आले समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 09:41 IST2025-04-06T09:39:10+5:302025-04-06T09:41:08+5:30
अक्षय केळकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

समृद्धी केळकरने केलं अक्षय केळकरचं केळवण, फोटो आले समोर
Akshay Kelkar Kelvan: सध्या मराठी सिनेसृष्टीत लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वाचा विजेता आणि अभिनेता अक्षय केळकर (Akshay Kelkar) लग्नबंधनात अडकणार आहे. गेल्या वर्षाअखेरीस अक्षयने होणाऱ्या बायकोचा चेहरा रिव्हिल करत लग्नबंधनात अडकणार असल्याचं सांगितलं होतं. अक्षयच्या होणाऱ्या पत्नीचं नाव साधना काकतकर असं आहे. आता त्यांच्या केळवणाला सुरूवात झाली आहे. याची खास झलक समोर आली आहे.
अक्षय आणि साधनाचं केळवण हे अक्षयची खास मैत्रीण आणि प्रसिद्ध मराठी अभिनेत्री समृद्धी केळकरने (Samruddhi Kelkar) केलं आहे. आमरस पुरी आणि बटाट्याची भाजी असा खास बेत तिनं केला होता. समृद्धीने या केळवणाचे खास फोटो सोशल मीडियाद्वारे शेअर करत दोघांना शुभेच्छाही दिल्या आहेत. अक्षय व समृद्धी हे एकमेकांचे चांगले मित्र आहेत. त्यांनी एकत्र कामही केलं आहे. दोघांच्या युट्युबवरील 'दोन कटींग' सीरिज चांगलीच लोकप्रिय झाली होती.
अक्षय आणि साधना येत्या मे महिन्यात बोहल्यावर चढणार आहेत. याबद्दल त्याने खास सोशल मीडिया पोस्ट शेअर करत माहिती दिली होती. "मे २०२५ ठरलं, आता ना फिरणे माघारी, वाजवा हो तुतारी, करा ही तयारी… तरीही मुलींनो, आय लव्ह यु… मी फक्त तुमचाच आहे" असं म्हणत त्याने लग्नाची तारीख सांगितली होती.
अक्षयच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तो संत निवृत्तीनाथांची भूमिका साकारत आहे. तर साधना ही गीतकार आणि गायिका आहे. साधनाने गायलेली आणि लिहिलेली गाणी सोशल मीडिया आणि यूट्युबवर प्रसिद्ध आहेत. तिने सावनी रवींद्र, मंगेश बोरगावकर अशा अनेक लोकप्रिय गायकांसोबत काम केलंय.