घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 09:03 IST2025-11-07T09:00:57+5:302025-11-07T09:03:35+5:30
घटस्फोटाची चर्चा असतानाच सुप्रसिद्ध अभिनेत्रीला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यामुळे चाहत्यांना काळजी वाटली आहे

घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
टेलिव्हिजन अभिनेत्री माही विज (Mahhi Vij) सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. माही आणि तिचा पती जय भानुशाली (Jay Bhanushali) यांच्यात घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून जोरदार सुरू आहेत. त्यातच, आता माही विज अचानक आजारी पडल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. या बातमीमुळे तिच्या चाहत्यांची चिंता वाढली आहे.
माही विज रुग्णालयात, कारण...
माही विजला सध्या जास्त ताप आल्याने रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. माहीची पब्लिसिस्ट अवंतिका सिन्हाने याविषयी सविस्तर खुलासा केला आहे. तिने सांगितलं की, "माहीला खूप ताप आणि अशक्तपणा जाणवत आहे, त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल केले आहे. डॉक्टरांनी ब्लड रिपोर्टसाठी तिची तपासणी केली आहे. रिपोर्ट काय येतील यावर पुढील उपचार अवलंबून आहे. सध्या तिची प्रकृती स्थिर आहे."
काही तासांपूर्वी माहीने स्वतः तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये ती आजारी दिसत होती. तिने औषधांच्या गोळ्यांचा फोटोही पोस्ट करत 'Sick' असे लिहिले होते.
घटस्फोटाच्या आणि पोटगीच्या चर्चा
जय भानुशालीसोबत माही विज घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसरल्या होत्या. विशेषतः, माही जयकडून ५ कोटी रुपयांची पोटगी मागत असल्याची अफवा होती. माहीने स्वतःच्या यूट्यूब चॅनलवर येऊन या अफवांचे खंडन केले होते. तिने स्पष्ट केले होते की, आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या महिलांनी घटस्फोटानंतर पतीवर अवलंबून न राहता स्वतः काम करावे. मात्र, गृहिणी आणि आर्थिकदृष्ट्या परावलंबी असलेल्या महिलांसाठी पोटगी घेणे योग्य आहे, असे मतही तिने व्यक्त केले होते. माहीने स्पष्ट सांगितलं नसलं तरी ती जयपासून घटस्फोट घेणार की नाही, हे पुढील काही दिवसांमध्ये कळलंय.