'३ इडियट्स' मधला 'सेंटिमीटर' आठवतोय का? 'या' मराठी मालिकेत साकारतोय भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 12:57 IST2024-12-31T12:56:10+5:302024-12-31T12:57:00+5:30
सेंटिमीटरची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने मराठी मालिकेत एन्ट्री घेतली आहे.

'३ इडियट्स' मधला 'सेंटिमीटर' आठवतोय का? 'या' मराठी मालिकेत साकारतोय भूमिका
'३ इडियट्स' या गाजलेल्या सिनेमातील सगळीच पात्र लोकप्रिय झाली होती. यातील मिलिमीटर आणि सेंटिमीटर ही पात्रही आठवत असतील. सिनेमात सुरुवातीला अभिनेता राहुल कुमारने मिलिमीटरची भूमिका साकारली होती. जो कॉलेजमधील विद्यार्थ्यांची सगळी कामं करुन देत असतो. यानंतर सिनेमाच्या शेवटी तेच कॅरेक्टर सेंटिमीटर म्हणून पुढे येतं. सिनेमातील रँचो म्हणजेच आमिर खान मिलिमीटरला शिकवतो आणि पुढे त्याच्याकडे नोकरीही देतो. सेंटिमीटरची भूमिका साकारणारा अभिनेत्याने मराठी मालिकेत एन्ट्री घेतली आहे.
'स्टार प्रवाह'वर नुकतीच 'लक्ष्मी निवास' ही मालिका सुरु झाली आहे. हर्षदा खानविलकर, तुषार दळवी, अक्षया देवधर असे कलाकार या मालिकेत आहेत. मालिकेत राजेश श्रृंगारपुरेही श्रीकांत या मुख्य भूमिकेत आहे. तर अक्षय देवधर भावनाची भूमिका साकारत आहे. मालिकेत या दोघांचं लग्न ठरल्याचा ट्रॅक सुरु आहे. दरम्यान हे लग्न श्रीकांतच्या कुटुंबातील काही सदस्यांना मान्य नाहीए. त्यामुळे ते कटकारस्थान करत आहेत. यामध्ये श्रीकांतच्या बहिणीच्या भूमिकेत अभिनेत्री सुप्रिया शिवलकर आहे. तर तिचा नवरा रवीची भूमिका साकारणारा अभिनेता आहे दुष्यंत वाघ (Dushyant Wagh). हाच अभिनेता '३ इडियट्स'मध्ये 'सेंटिमीटर'च्या भूमिकेत दिसला आहे. दुष्यंत मालिकेत खलनायकाची भूमिका साकारत आहे.
दुष्यंत वाघ मराठी अभिनेता असून त्याने 'दे धमाल' या लोकप्रिय मालिकेत बालकलाकार म्हणून भूमिका साकारली होती. तो 'कस्तुरी', 'मन उधाण वाऱ्याचे', 'इश्क मे मरजावाँ', 'ना बोले तुम ना मैने कुछ कहा' या मालिकांमध्येही दिसला आहे. २००१ साली अजय देवगणच्या 'तेरा मन साथ रहे' सिनेमातून त्याने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. तो 'डोंबिवली फास्ट', 'महाराष्ट्र शाहीर', 'पानिपत', 'सुंबरान' यासारख्या काही सिनेमांमध्येही दिसला आहे.