औरंगाबादचं नाव बदललं मग एअरपोर्टचं का नाही? मिलिंद गवळींचा सवाल, म्हणाले- "एअरपोर्टला उतरल्यानंतर..."
By कोमल खांबे | Updated: February 21, 2025 13:59 IST2025-02-21T13:59:02+5:302025-02-21T13:59:20+5:30
एका इव्हेंटनिमित्त मिलिंद गवळी छत्रपती संभाजीनगरला गेले होते. मात्र एअरपोर्टचं नाव अद्याप बदललं नसल्याचं मिलिंद गवळी यांनी म्हटलं आहे. एअरपोर्टचं नाव का बदललं नाही? असा सवाल त्यांनी पोस्ट शेअर करत केला आहे.

औरंगाबादचं नाव बदललं मग एअरपोर्टचं का नाही? मिलिंद गवळींचा सवाल, म्हणाले- "एअरपोर्टला उतरल्यानंतर..."
मिलिंद गवळी हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. अभिनयाने त्यांनी एक काळ गाजवला. आई कुठे काय करते मालिकेतील त्यांची अनिरुद्ध ही भूमिका चांगलीच गाजली. आता ते स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. मिलिंद गवळी हे सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असतात. अनेकदा ते पोस्टमधून महत्त्वाचे मुद्दे मांडत असतात. आतादेखील त्यांनी औरंगाबाद एअरपोर्टबाबत पोस्ट लिहिली आहे.
नुकतंच एका इव्हेंटनिमित्त मिलिंद गवळी छत्रपती संभाजीनगरला गेले होते. २०२३ मध्येच औरंगाबाद जिल्ह्याचं आणि शहाराचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असं करण्यात आलं होतं. मात्र एअरपोर्टचं नाव अद्याप बदललं नसल्याचं मिलिंद गवळी यांनी म्हटलं आहे. एअरपोर्टचं नाव का बदललं नाही? असा सवाल त्यांनी पोस्ट शेअर करत केला आहे.
मिलिंद गवळींची पोस्ट
आज स्टार प्रवाह च्या एका Event साठी पहाटेची फ्लाईट पकडून संभाजीनगर ला पोहोचलो. 'लोकमत सखी मंच' यांचा आज संध्याकाळी संभाजीनगरमध्ये इव्हेंट आहे. मला आमंत्रित केलेलं आहे. त्यासाठी मी आणि स्टारप्रवाहचे हितेश आढाव आलेलो आहोत.
'लोकमत सखी मंच' इव्हेंट म्हणजे खूपच happening , Event असतो. खूप धमाल मस्ती असते. गेल्या पाच वर्षांमध्ये मी 'लोकमत सखी मंच'चे असंख्य events attend केले आहेत. स्टार प्रवाह वरच्या 'आई कुठे काय करते' या मालिकेमधल्या 'अनिरुद्ध देशमुख' विषयी सखी मंचच्या बायकांना खूपच कुतूहल असायचं. 'अनिरुद्ध देशमुख' म्हणून मी स्टेजवर आल्यानंतर वेगळंच वातावरण असायचं. आज संभाजीनगरमध्ये लोकमतच्या कार्यक्रमांमध्ये फक्त 'अनिरुद्ध देशमुख' म्हणून नाहीतर "यशवंतराव भोसले" माजी समाज कल्याण मंत्री म्हणून सुद्धा असणार आहे. 'लग्नानंतर होईलच प्रेम' या स्टार प्रवाहच्या मालिकेमध्ये नुकतीच माझी entry झालेली आहे. प्रेक्षकांमध्ये त्याचंही कुतूहल असेलच.
आज सकाळी इंडिगो फ्लाईटने येत असताना मला एक प्रश्न पडलेला आहे. फ्लाइट्चे कॅप्टन म्हणाले "आपण औरंगाबादला पोहोचतो आहोत". एअरपोर्टला उतरल्यानंतर तिथे औरंगाबाद एअरपोर्ट असं ही लिहिलेलं आहे. जर आपण औरंगाबादचं नाव बदललं आहे असं म्हणतो...छत्रपती संभाजीनगर केलेलं आहे. मग एअरपोर्टचं नाव अजून का बदललेलं नसावं? Airport authority of India ला हे लागू पडत नाही का? जसं मुंबईला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस केलेलं आहे. तसंच इथे पण छत्रपती संभाजी महाराज एअरपोर्ट असं असायला हवं होतं...झालं असतं तर छान वाटलं असतं.
मिलिंद गवळींची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.