सुपरस्टार रजनीकांत अभिनयातून निवृत्ती घेणार? 'ही' खास व्यक्ती 'थलायवा'चा शेवटचा सिनेमा दिग्दर्शित करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 12:54 IST2026-02-18T12:51:49+5:302026-02-18T12:54:48+5:30
भारतीय सिनेसृष्टीचे सुपरस्टार आणि चाहत्यांचे लाडके 'थलायवा' रजनीकांत निवृत्ती घेणार अशा बातम्यांनी चांगलाच जोर धरला आहे. गेल्या ५० वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे रजनीकांत आता सिनेसृष्टीला रामराम ठोकणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे

सुपरस्टार रजनीकांत अभिनयातून निवृत्ती घेणार? 'ही' खास व्यक्ती 'थलायवा'चा शेवटचा सिनेमा दिग्दर्शित करणार
भारतीय सिनेसृष्टीचे सुपरस्टार आणि चाहत्यांचे लाडके 'थलायवा' रजनीकांत निवृत्ती घेणार अशा बातम्यांनी चांगलाच जोर धरला आहे. गेल्या ५० वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे रजनीकांत आता सिनेसृष्टीला रामराम ठोकणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. इतकंच नव्हे रजनीकांत त्यांच्या शेवटच्या चित्रपटाच्या शुटिंगचीही तयारी करत असल्याचं म्हटलं जातंय. जाणून घ्या सविस्तर
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
रजनीकांत खरंच निवृत्ती घेणार?
बॉलिवूड लाईफने दिलेल्या रिपोर्टनुसार, रजनीकांत सध्या निवृत्तीच्या विचारात आहेत. रजनीकांत यांच्या कारकिर्दीतील अखेरचा चित्रपट त्यांची लेक सौंदर्या दिग्दर्शित करु शकते, असंही बोललं जातंय. हा चित्रपट केवळ एक सिनेमा नसून रजनीकांत यांच्या गौरवशाली कारकिर्दीला दिलेली एक मानवंदना असेल, अशी सौंदर्याची भावना आहे.
निवृत्तीचे कारण काय?
सध्या ७५ वर्षांचे असलेल्या रजनीकांत यांची प्रकृती आणि वाढते वय हे निवृत्तीमागचे मुख्य कारण असल्याचे सांगितले जात आहे. 'जेलर', 'लाल सलाम' आणि 'वेट्टैयान' सारख्या हिट चित्रपटांनंतर त्यांनी कामाचा वेग थोडा कमी केला आहे. सध्या ते 'जेलर २' या बिग बजेट प्रोजेक्टमध्ये काम करत आहेत. रिपोर्टनुसार, हा चित्रपट पूर्ण केल्यानंतर ते सौंदर्यासोबतच्या प्रोजेक्टवर काम करतील आणि त्यानंतर सिनेसृष्टीचा निरोप घेतील. अर्थात या सर्व चर्चा असून रजनीकांत किंवा सौंदर्याने याविषयी अधिकृत खुलासा केला नाही.
यापूर्वी २०१४ मध्ये 'कोचादैयान' या अॅनिमेटेड चित्रपटाचे दिग्दर्शन सौंदर्याने केले होते, ज्यामध्ये रजनीकांत मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट भारतातील पहिला फोटो-रिअलिस्टिक मोशन कॅप्चर चित्रपट होता. आता सौंदर्या पुन्हा एकदा आपल्या वडिलांसोबत एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये काम करण्यास सज्ज झाली आहे. हा प्रोजेक्ट रजनीकांत यांचा 'बायोपिक' असेल की एखादा वेगळा सिनेमा, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
रजनीकांत यांच्या निवृत्तीच्या चर्चा सुरु होताच त्यांचे जगभरातील लाखो चाहते भावुक झाले आहेत. "थलायवा कधीच निवृत्त होऊ शकत नाही," अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत. मात्र, रजनीकांत किंवा त्यांच्या कुटुंबीयांकडून अभिनेत्याच्या निवृत्तीबाबत अद्याप कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही. रजनीकांत सध्या त्यांंचं आत्मचरित्र लिहित आहेत, अशी माहिती सौंदर्याने नुकतीच दिली होती. त्यामुळे अभिनयातून निवृत्ती घेऊन ते आपल्या लेखनावर आणि कुटुंबावर लक्ष केंद्रित करण्याची शक्यता अधिक वर्तवली जात आहे.