थलपती विजयचा मास्टरस्ट्रोक! मुख्यमंत्री झाल्यावरच रिलीज करणार सिनेमा, 'जन नायकन'च्या प्रदर्शनाची तारीख समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 16:39 IST2026-05-08T16:38:10+5:302026-05-08T16:39:10+5:30
'जन नायकन' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून आता काहीच काळ थलपती विजयच्या चाहत्यांना वाट पाहावी लागणार आहे.

थलपती विजयचा मास्टरस्ट्रोक! मुख्यमंत्री झाल्यावरच रिलीज करणार सिनेमा, 'जन नायकन'च्या प्रदर्शनाची तारीख समोर
साऊथ सुपरस्टार थलपती विजयच्या तामिळनाडूतील मोठ्या विजयनंतर आता त्याचा शेवटचा सिनेमा 'जन नायकन'च्या प्रदर्शनाचा अडथळाही दूर झाला आहे. 'जन नायकन' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून आता काहीच काळ थलपती विजयच्या चाहत्यांना वाट पाहावी लागणार आहे. येत्या जून महिन्यात 'जन नायकन' सिनेमा प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, थलपती विजयचा 'जन नायकन' सिनेमा २२ जून २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. २२ जूनला थलपती विजयचा वाढदिवस असतो. त्याच्या वाढदिवसाचा मुहुर्त साधत अभिनेत्याचा शेवटचा सिनेमा रिलीज करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. पण, अद्याप याबाबत कोणतीही ऑफिशियल माहिती देण्यात आलेली नाही.
थलपती विजयने 'तमिळगा वेत्री कळघम' (TVK) पक्ष स्थापन करत राजकारणात एन्ट्री घेतली आणि अभिनयाला रामराम केला. 'जन नायकन' हा थलपती विजयचा शेवटचा सिनेमा आहे. सेन्सॉर बोर्डाच्या (CBFC) प्रमाणपत्रामुळे सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. 'जन नायकन' हा एक पॉलिटिकल थ्रिलर असून थलपती विजय मुख्य भूमिकेत आहे. एच. विनोथ यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून पूजा हेगडे, बॉबी देओल, प्रकाश राज आणि ममिता बैजू यांच्या भूमिका आहेत.