अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर सोनू सूदची प्रतिक्रिया; म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 12:44 IST2024-12-15T12:43:35+5:302024-12-15T12:44:18+5:30
अभिनेता सोनू सूदनेही अल्लू अर्जुनच्या अटकेवर प्रतिक्रिया दिली आहे.

अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर सोनू सूदची प्रतिक्रिया; म्हणाला...
सध्या अल्लू अर्जुन संपूर्ण देशात 'टॉक ऑफ द टाऊन' बनला आहे. तेलंगणा उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर काल (शनिवार) सकाळी साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुनची हैदराबाद सेंट्रल जेलमधून सुटका करण्यात आली. तुरुंगात एक रात्र घालवलेल्या 'पुष्पाराज'च्या समर्थनार्थ केवळ चित्रपट कलाकारच नाही तर लाखो चाहते त्याच्याबाजूने उभे आहेत. अभिनेता सोनू सूदनेही अल्लू अर्जुनच्या अटकेवर प्रतिक्रिया दिली आहे.
शनिवारी सकाळी अल्लू अर्जुनची तुरुंगातून सुटका झाली आणि तो आपल्या घरी परतला. राणा दग्गुबती आणि नागा चैतन्यसह अनेक चित्रपट कलाकार अल्लू अर्जुनच्या घरी भेटायला गेले. एएनआयशी बोलताना सोनू सूद म्हणाला, "मला वाटते हा प्रश्न आता सुटला आहे. 'ऑल इज वेल दॅट एंड्स वेल' या म्हणीप्रमाणे. मला त्याचे अभिनंदन करायचं आहे. मी यापूर्वीही त्याच्यासोबत काम केलं आहे आणि मला माहित आहे की हे एका अभिनेत्याचे जीवन आहे. चढ-उतार हा या प्रवासाचा भाग आहे".
काय प्रकरण?
हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये ‘पुष्पा २: द रूल’च्या ४ डिसेंबर २०२४ रोजी झालेल्या प्रीमियरला अल्लू अर्जुनने हजेरी लावली होती. याचवेळी चेंगराचेंगरी झाली आणि एका महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणात अल्लू अर्जुनवर कारवाई करण्यात आली होती. हैदराबाद पोलिसांनी शुक्रवारी (१३ डिसेंबर २०२४ रोजी ) अभिनेता अल्लू अर्जुनला अटक केली. अटकेनंतर लगेचच त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मात्र, त्यानंतर तेलंगणा उच्च न्यायालयाने त्याला अंतरिम जामीन मंजूर केला. जामीन मंजूर झाल्यानंतरही त्याला अल्लू अर्जूनला एक रात्र तुरुंगात काढावा लागली. उच्च न्यायालयाने अल्लू अर्जुनला चार आठवड्यांसाठी अंतरिम जामीन मंजूर केला आहे. तसेच अभिनेत्याला ५० हजार रुपयांचा पर्सनल बाँड सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.