रश्मिकाला खानदानी भेट! लग्नाआधी विजय देवराकोंडाच्या आईने होणाऱ्या सूनेला दिली 'ही' मौल्यवान वस्तू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 11:42 IST2026-02-25T11:41:40+5:302026-02-25T11:42:57+5:30
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय जोडी विजय देवराकोंडा आणि रश्मिका मंदाना यांच्या लग्नाची सध्या देशभरात चर्चा आहे. राजस्थानमधील उदयपूर येथे या शाही विवाहाचे विधी सुरू झाले असून, संगीत सोहळ्यातील एका खास घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

रश्मिकाला खानदानी भेट! लग्नाआधी विजय देवराकोंडाच्या आईने होणाऱ्या सूनेला दिली 'ही' मौल्यवान वस्तू
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय जोडी विजय देवराकोंडा आणि रश्मिका मंदाना यांच्या लग्नाची सध्या देशभरात चर्चा आहे. राजस्थानमधील उदयपूर येथे या शाही विवाहाचे विधी सुरू झाले असून, संगीत सोहळ्यातील एका खास घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. विजय देवराकोंडाची आई माधवी यांनी आपल्या होणाऱ्या सुनेला म्हणजेच रश्मिकाला त्यांच्या कुटुंबाचा एक अनमोल वारसा भेट म्हणून देणार आहेत.
खानदानी बांगड्यांची भेट
'अमर उजाला'ने दिलेल्या वृत्तानुसार, संगीत सोहळ्यादरम्यान विजयची आई रश्मिकाला त्यांच्या कुटुंबातील पिढ्यानपिढ्या जपलेल्या पारंपरिक बांगड्या भेट देणार आहेत. हा केवळ दागिना नसून देवरकोंडा कुटुंबाने रश्मिकाचा सून म्हणून केलेला स्वीकार आणि तिच्यावरील प्रेमाचे प्रतीक मानले जात आहे. या भावनिक क्षणामुळे दोन्ही कुटुंबांमधील जवळीक अधिकच स्पष्ट झाली आहे.
दोन परंपरांनी होणार विवाह
विजय आणि रश्मिकाचा विवाह २६ फेब्रुवारी रोजी उदयपूरमधील एका ऐतिहासिक महालात पार पडणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हे लग्न दोन वेगवेगळ्या परंपरांनुसार होण्याची शक्यता आहे. या सोहळ्यासाठी अत्यंत मोजकेच नातेवाईक आणि मित्रमंडळी उपस्थित असून, सुरक्षेची कडेकोट व्यवस्था करण्यात आली आहे.
लग्नाआधी उदयपूरमध्ये पूल पार्टी, व्हॉलीबॉल मॅच आणि कॅन्डललाईट डिनर अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 'विरोश' (Virosh) प्रीमियर लीग नावाच्या एका क्रिकेट सामन्याचाही आनंद हे जोडपं लुटणार आहे. रश्मिकाने स्वतः सोशल मीडियावर या सुंदर क्षणांचे काही फोटो शेअर करून चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे. उदयपूरमध्ये खासगी पद्धतीने लग्न आटोपल्यानंतर, ४ मार्च रोजी हैदराबादमध्ये चित्रपटसृष्टीतील मित्रमंडळी आणि सहकाऱ्यांसाठी एक भव्य रिसेप्शन आयोजित करण्यात येणार आहे.