'पुष्पा २' प्रीमिअर: चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्या महिलेचा मुलगा व्हेंटिलेटरवर, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 11:36 IST2024-12-15T11:35:26+5:302024-12-15T11:36:36+5:30
pushpa 2 sandhya theatre stampede case: पुष्पा २ प्रीमिअरला झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला. तर तिचा ९ वर्षीय मुलगा जगण्यासाठी लढतोय.

'पुष्पा २' प्रीमिअर: चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्या महिलेचा मुलगा व्हेंटिलेटरवर, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
Pushpa 2 SandhyaTheatre Stampede case: अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि त्याचा सिनेमा 'पुष्पा 2: द रुल' गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. चाहत्यांध्ये सिनेमाची प्रचंड क्रेझ आहे. सिनेमाच्या रिलीजच्या आदल्या दिवशीच हैदराबाद येथील संध्या थिएटरमध्ये झालेल्या प्रीमिअरला दुर्घटना घडली. प्रीमिअरला प्रचंड चेंगराचेंगरी झाली आणि त्यातच एका महिलेचा मृत्यू झाला. तर त्या महिलेचा मुलगा अजूनही हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. नुकतंच त्या मुलाच्या तब्येतीसंदर्भात अपडेट आली आहे.
'द हिंदू' च्या रिपोर्टनुसार, संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत रेवती या महिलेचा मृत्यू झाला. तर त्यांचा ८ वर्षांचा मुलगा श्री तेज सध्या हॉस्पिटलमध्ये जगण्यासाठी लढतोय. १० दिवस झाले तरी त्याच्या तब्येतीत सुधारणा नसून त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. सिकंदराबाद येथील KIMS कडल्स रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहे. पीडियाट्रिक इंटेन्सिव्ह केयर युनिट मध्ये ठेवण्यात आले आहे. हेमोडायनामिक रुपात तो स्थिर आहे मात्र त्याला ट्यूब फीडिंग करावं लागत आहे. थांबत थांबत त्याला सतत ताप येतोय. सध्या त्याची तब्येत चिंताजनक आहे.
त्या दिवशी नक्की झालं काय?
४ डिसेंबर रोजी संध्या थिएटरमध्ये 'पुष्पा २' चा प्रीमिअर होता. थिएटरबाहेर चाहत्यांची तुफान गर्दी होती. सगळे जल्लोष करत होते. अल्लू अर्जुनही स्क्रीनिंगला येत असल्याचं समजताच गर्दी नियंत्रणाबाहेर गेली. कोणाला उभं राहायलाही जागा नव्हती. परिणामी चेंगराचेंगरी झाली. दिलसुखनगरला राहणारी ३९ वर्षीय रेवती तिच्या पतीसह, ९ वर्षीय श्री तेज या मुलाला आणि ७ वर्षीय सान्विका या मुलीला घेऊन सिनेमा पाहायला आली होती. थिएटरमध्ये अल्लू अर्जुनची एन्ट्री झाली. बाहेरील लोकांनी आतमध्ये येण्यासाठी धक्काबुक्की केली. याचवेळी रेवती आणि त्यांचा मुलगा गुदमरुन बेशुद्ध झाले. ९ वर्षांचा मुलगा गर्दीत अक्षरश:दबला गेला होता. पोलिसांची त्याच्यावर नजर पडली. तातडीने रेवती आणि मुलाला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. रेवती यांचा तोपर्यंत मृत्यू झाला होता, तर मुलावर सध्या उपचार सुरु आहेत.
अल्लू अर्जुनला अटक आणि सुटका
दरम्यान महिलेच्या मृत्यूप्रकरणी १३ डिसेंबरला तेलंगणा पोलिसांनी अभिनेता अल्लू अर्जुनला अटक केली. सेशन कोर्टाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीही सुनावली. तर लगेच हायकोर्टात त्याला अंतरिम जामीन मंजूर झाला. मात्र ऑर्डर वेळेत मिळाल्याने अल्लू अर्जुनला एक रात्र तुरुंगात काढावी लागली. तर दुसरीकडे दिवंगत रेवती यांच्या पतीने अल्लू अर्जुनविरोधात कोणतीही तक्रार नाही असे स्पष्ट केले. तसंच अल्लू अर्जुनने कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. इतकंच नाही तर दुर्घटना घडल्यानंतर त्याने कुटुंबाला २५ लाख रुपयांची मदतही केली.