सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रीने केली निवृत्तीची घोषणा; ३०० हून अधिक सिनेमांमध्ये केलंय काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 11:47 IST2025-11-20T11:45:01+5:302025-11-20T11:47:25+5:30
वयाच्या ५७ व्या वर्षी लोकप्रिय अभिनेत्रीने निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांंना चांगलाच धक्का बसला आहे

सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रीने केली निवृत्तीची घोषणा; ३०० हून अधिक सिनेमांमध्ये केलंय काम
सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध आणि ज्येष्ठ अभिनेत्री तुलसी यांनी अभिनयातून निवृत्ती जाहीर केली आहे. आपल्या सुमारे सहा दशकांच्या दीर्घ आणि यशस्वी चित्रपट कारकीर्दीला विराम देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. तुलसी यांनी स्वतः सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती चाहत्यांना दिली असून, त्यांच्या या निर्णयामुळे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.
साईबाबांवर श्रद्धा आणि निवृत्तीची घोषणा
तुलसी यांनी आपल्या पोस्टमध्ये सर्वप्रथम साईबाबांच्या पादुकांचा एक फोटो पोस्ट केला. सोबत कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, "माझी आणि माझ्या मुलाची साईबाबांनी काळजी घ्यावी. या ३१ डिसेंबर रोजी शिर्डी साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर मी माझ्या निवृत्तीची घोषणा करेन. यापुढचा माझा प्रवास साईबाबांच्या नामस्मरणात शांततेने पार पडेल. या प्रवासात मला शिकायला मदत केल्याबद्दल मी प्रत्येकाचे आभार मानते."
तुलसी यांच्या या भावनिक संदेशामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. याशिवाय अनेकांनी त्यांच्या निर्णयाचा आदर केला असून त्यांना आयुष्यातील नवीन प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
बालकलाकार म्हणून केली होती सुरुवात
अभिनेत्री तुलसी यांनी १९६७ मध्ये प्रदर्शित झालेल्या तेलुगू चित्रपट 'भार्या' मधून बालकलाकार म्हणून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. १९७३ मध्ये के. बालचंदर यांच्या 'अरंगेत्रम' या चित्रपटातून त्यांचं करिअर खऱ्या अर्थाने सुरू झाले. त्यांनी १९७८ मधील 'सीतामलक्ष्मी', १९७९ मधील 'शंकरभरणम' आणि १९८१ मधील 'मुद्दा मंदरम' यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.
तुळसी यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक दिग्गजांसोबत काम केले. यामध्ये कमल हासन, रजनीकांत, मोहनलाल, चिरंजीवी आणि विजय सेतुपती यांसारख्या कलाकारांचा समावेश आहे. अलीकडच्या काळात, त्यांनी 'मिस्टर परफेक्ट', 'श्रीमंथुडु', राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'महानती' आणि 'डिअर कॉमरेड' यांसारख्या यशस्वी चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण सहाय्यक भूमिका साकारल्या होत्या.