"२२ लाख विद्यार्थ्यांची मेहनत धुळीला मिळाली"; NEET 2026 परीक्षा रद्द, कमल हासन संतापले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 10:31 IST2026-05-13T10:30:30+5:302026-05-13T10:31:54+5:30
NEET 2026 परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर दक्षिण भारतीय सुपरस्टार आणि राजकारणी कमल हासन यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

"२२ लाख विद्यार्थ्यांची मेहनत धुळीला मिळाली"; NEET 2026 परीक्षा रद्द, कमल हासन संतापले
Kamal Haasan Reaction Neet Paper Leak : पेपरफुटीमुळे राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (एनटीए) नीट यूजी २०२६ परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी होणार आहे. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची ही परीक्षा आता नव्याने घेतली जाणार आहे. याचा फटका २२ लाख विद्यार्थ्यांना बसणार आहे. परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर दक्षिण भारतीय सुपरस्टार आणि राजकारणी कमल हासन यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
कमल हासन यांनी ट्विटरवर (X) तमिळ भाषेत पोस्ट करत त्यांनी यंत्रणेवर ताशेरे ओढले. "NEET प्रवेश परीक्षेसाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या २२ लाख विद्यार्थ्यांची मेहनत आणि त्यांची स्वप्ने, गुन्हेगारी स्वरूपाच्या कारस्थानांमुळे धुळीस मिळाली आहेत. या मानसिक वेदनांची जबाबदारी कोण घेणार? आजपर्यंत एकही आरोप न होता पार पडलेली 'NEET' परीक्षा मला आठवत नाही. म्हणूनच, शिक्षणाचा विषय पुन्हा 'राज्य सूची'मध्ये आणण्यासाठी आम्ही लढा देत आहोत. भारतीय विद्यार्थ्यांचे या अन्यायकारक 'NEET' परीक्षेपासून आणि त्यामागे कार्यरत असलेल्या माफियांपासून रक्षण केलेच पाहिजे", असे त्यांनी म्हटले.
நீட் நுழைவுத் தேர்வுக்காக இரவு பகலாகப் படித்த 22 லட்சம் மாணவர்களின் உழைப்பும் கனவும் குற்றக்கும்பல்களால் சிதைக்கப்பட்டுள்ளது. இந்த மன உளைச்சலுக்குப் பொறுப்பேற்கப் போவது யார்?
— Kamal Haasan (@ikamalhaasan) May 12, 2026
இதுவரை ஒரு நீட் தேர்வு கூட முறைகேடு புகார்கள் இல்லாமல் நடந்ததாக எனக்கு நினைவில்லை. இதனால்தான் கல்வியை…
नव्याने घेतली जाणार परीक्षा
'NEET (UG)' ही पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळण्यासाठी 'नॅशनल टेस्टिंग एजन्सी' (NTA) द्वारे घेतली जाणारी एक राष्ट्रीय प्रवेश परीक्षा आहे. रद्द झालेली ही परीक्षा आता पुन्हा नव्याने घेतली जाईल. या पुनर्परीक्षेच्या तारखा लवकरच अधिकृतपणे जाहीर केल्या जातील. भारतातील ५५१ शहरांमध्ये आणि परदेशातील १४ शहरांमध्ये ही परीक्षा पार पडली होती. परीक्षा रद्द झाल्याचे वृत्त समजताच दिल्लीसह देशभरात विद्यार्थ्यांनी आंदोलने सुरू केली आहेत. 'नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया'च्या (NSUI) कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन केंद्र सरकार आणि NTA विरोधात घोषणाबाजी केली.