घटस्फोटानंतर डिप्रेशनमध्ये होता माझा मुलगा, नागार्जुनचं वक्तव्य; म्हणाला, 'आता आम्ही...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 16:29 IST2024-08-09T16:28:57+5:302024-08-09T16:29:42+5:30
नागा चैतन्यच्या साखरपुड्यानंतर नागार्जुनने दिली प्रतिक्रिया

घटस्फोटानंतर डिप्रेशनमध्ये होता माझा मुलगा, नागार्जुनचं वक्तव्य; म्हणाला, 'आता आम्ही...'
साऊथ स्टार नागा चैतन्यने (Naga Chaitanya) काल अभिनेत्री शोभिता धुलिपालासोबत (Sobhita Dhulipala) साखरपुडा केला. २०२१ सालीच नागा चैतन्यचा समंथा रुथ प्रभूसोबत घटस्फोट झाला होता. घटस्फोटानंतर समंथाने अनेकदा मुलाखतींमधून तिच्यावर किती परिणाम झाला आहे हे दाखवलं. पण नागा चैतन्यने यावर कधीच प्रतिक्रिया दिली नव्हती. आता लेकाच्या साखरपुड्यानंतर वडील नागार्जुन (Nagarjuna Akkineni) यांनी भाष्य केलं आहे.
टाइम्स नाऊशी बातचीत करताना नागार्जुन म्हणाले, "फंक्शन खूप छान झालं. नागाच्या आयुष्यात पुन्हा एकदा आनंद आला आहे. तो खूप खूश आहे आणि मी सुद्धा. गेली काही वर्ष नागा आणि आम्ही कठीण परिस्थितीतून गेलो. घटस्फोटामुळे तो डिप्रेस झाला होता. माझा मुलगा कोणालाच त्याच्या भावना सांगत नाही पण मला ठाऊक होतं की तो नाखूश आहे. आता त्याला पुन्हा आनंदी पाहतोय. शोभिता आणि नागा छान कपल आहे. दोघंही एकमेकांवर प्रेम करतात."
दोघांचं लग्न कधी होणार यावर नागार्जुन म्हणाले, "लग्न आता लगेच होणार नाही. जसं मी म्हणालो आम्ही साखरपुडा केला कारण हा खूप खास दिवस होता. दोघंही लग्नासाठी तयार आहेत म्हणून आम्ही विचार केला की साखरपुडा उरकून घेऊया. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण मी शोभिताला नागापेक्षाही आधीपासून ओळखतो. तो तिला २ वर्षांपासून ओळखतो तर मी तिला ६ वर्षांपूर्वीच भेटलो होतो."
समंथाविषयी ते म्हणाले, "हो मला समंथा आजही मुलीसारखीच आहे. पण जे काही त्या दोघांमध्ये झालं ते वेगळं आहे."
नागा चैतन्य आणि समंथाचा 2018 साली विवाह झाला होता. तर लग्नानंतर तीनच वर्षात २०२१ साली त्यांनी घटस्फोट घेतला. यानंतर समंथा पूर्णपणे खचली होती. तर नागाने मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती.