अभिमानास्पद! 'महावतार नरसिंह' सिनेमा ऑस्करच्या शर्यतीत, भारतीयांसाठी आनंदाची गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 13:14 IST2025-11-26T13:12:50+5:302025-11-26T13:14:05+5:30
२०२५ मध्ये बॉक्स ऑफिसवर वादळ निर्माण करणारा 'महावतार नरसिंह' सिनेमा ऑस्करच्या शर्यतीत गेला आहे. जाणून घ्या सविस्तर

अभिमानास्पद! 'महावतार नरसिंह' सिनेमा ऑस्करच्या शर्यतीत, भारतीयांसाठी आनंदाची गोष्ट
९८ व्या ऑस्कर पुरस्कारांसाठी भारताकडून दोन महत्त्वपूर्ण चित्रपटांची नावे समोर आली आहेत. चित्रपट निर्माते नीरज घायवान यांचा 'होमबाऊंड' (Homebound) आणि अश्विन कुमार दिग्दर्शित ॲनिमेटेड फीचर फिल्म 'महावतार नरसिंह' (Mahavatar Narsimha) या दोन सिनेमांना ऑस्करच्या नॉमिनेशन निवड प्रक्रियेच्या प्राथमिक यादीत स्थान मिळालं आहे.
भारतीय सिनेमा मारणार का ऑस्करमध्ये बाजी?
'महावतार नरसिंह' या सिनेमाला 'सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड फीचर फिल्म' (Best Animated Feature Film) या श्रेणीसाठी विचारात घेतले जात आहे. एकूण ३५ ॲनिमेटेड चित्रपटांमधून ऑस्कर समिती अंतिम नामांकनासाठी केवळ पाच चित्रपटांची निवड करणार आहे. विशेष म्हणजे, 'महावतार नरसिंह' ला या श्रेणीत 'K-Pop Demon Hunters', 'Demon Slayer: Infinity Castle', 'The Bad Guys 2' आणि 'Zootopia 2' यांसारख्या जागतिक स्तरावरील मोठ्या आणि यशस्वी ॲनिमेटेड चित्रपटांशी स्पर्धा करावी लागणार आहे.
Big win for Indian animation! 🇮🇳#MahavatarNarsimha has officially entered the Oscars 2026 eligibility list for Best Animated Feature, standing alongside 35 global contenders. If it secures a nomination, it’ll mark a historic first for Indian animation. #MissMalinipic.twitter.com/9uFjy2rhDG
— MissMalini (@MissMalini) November 25, 2025
'महावतार नरसिंह' हा सिनेमा व्यावसायिक यशाच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण ठरला आहे. तेलुगू, हिंदी, कन्नड आणि तमिळ भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर २५० कोटींहून अधिक कमाई करून भारतीय ॲनिमेटेड चित्रपटांमध्ये सर्वाधिक कमाईचा विक्रम नोंदवला आहे.
'होमबाऊंडची'ही चर्चा
दुसरीकडे, नीरज घायवान दिग्दर्शित 'होमबाऊंड' चित्रपट 'सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म' (Best International Feature Film) या श्रेणीत सामील झाला आहे. जान्हवी कपूर, इशान खट्टर आणि विशाल जेठवा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाला या विभागात ८६ आंतरराष्ट्रीय सिनेमांशी स्पर्धा करावी लागणार आहे, ज्यात 'Young Mothers' आणि 'The President’s Cake' यांसारख्या जागतिक स्तरावर गाजलेल्या सिनेमांचा समावेश आहे. 'होमबाऊंड' सिनेमा व्यावसायिक दृष्ट्या अपयशी ठरला असला तरी त्याला ऑस्करच्या शर्यतीत मानाचे स्थान मिळाले आहे.
त्यामुळे भारतात गाजलेला ॲनिमेशनपट 'महावतार नरसिंह' आणि नीरज घायवान दिग्दर्शित होमबाऊंड या दोन्ही सिनेमांना ऑस्करच्या अंतिम नॉमिनेशन श्रेणीत स्थान मिळेल का, याची सर्वांना उत्सुकता आहे.