अवघ्या ३० व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्याने आयुष्य संपवलं, वडीलांवर उपचार सुरु असताना उचललं टोकाचं पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 17:55 IST2025-12-13T17:55:06+5:302025-12-13T17:55:55+5:30
अवघ्या ३० व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्याने आयुष्य संपवलं;राहत्या घरी गळफास घेऊन केली आत्महत्या

अवघ्या ३० व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्याने आयुष्य संपवलं, वडीलांवर उपचार सुरु असताना उचललं टोकाचं पाऊल
मनोरंजन विश्वातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेता अखिल विश्वनाथने (Akhil Vishwanath) वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. गुरुवार, ११ डिसेंबर २०२५ रोजी केरळमधील राहत्या घरी अखिलने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. अखिलच्या अकस्मात जाण्याने चित्रपटसृष्टी आणि त्यांच्या कुटुंबीयांना जबर धक्का बसला आहे.
आई कामावर जात असताना घटना उघडकीस
मिळालेल्या माहितीनुसार, अखिल विश्वनाथने गळफास घेऊन त्याचं आयुष्य संपवलं. अभिनेत्याची आई गीता या कामावर जाण्यासाठी घरातून निघत असताना ही घटना त्यांच्या लक्षात आली. अखिल अभिनयासोबतच कोट्टली येथील एका मोबाईल फोनच्या दुकानात मॅकेनिक म्हणून काम करत होता, मात्र गेल्या काही दिवसांपासून त्याने कामावर जाणे बंद केले होते.
अखिलच्या कुटुंबासाठी गेल्या काही महिन्यांपासून परिस्थिती कठीण होती. अखिलचे वडील चुंकल चेंचेरिवलप्पिल हे रिक्षाचालक असून, तीन महिन्यांपूर्वी त्यांचा अपघात झाला होता. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वडिलांवर उपचार सुरू असतानाच अखिलने टोकाचं पाऊल उचलल्याने कुटुंबावर मोठं संकट कोसळले आहे.
अखिल विश्वनाथच्या निधनामुळे मल्याळम चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला असून, अभिनेत्याच्या आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. अखिल हा अभिनयाच्या क्षेत्रात चांगली कामगिरी करत होता आणि एक उदयोन्मुख अभिनेता म्हणून त्याच्याकडे पाहिले जात होते. त्याच्या निधनाने अभिनेत्याचा मित्रपरिवार आणि सहकलाकार शोकसागरात बुडाले आहेत.