अभिनेता अल्लू अर्जुनला अटक; कोणत्या कलमांतर्गत गुन्हा दाखल? किती वर्षांची शिक्षा होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 14:49 IST2024-12-13T14:49:03+5:302024-12-13T14:49:55+5:30

Allu Arjun Arrest News: चेंगराचेंगरीत झालेल्या महिलेच्या मृत्यूप्रकरणी अल्लू अर्जुनला हैदराबाद पोलिसांनी अटक केली आहे.

Actor Allu Arjun arrested; Under which section has the case been registered? How many years of imprisonment will he get? | अभिनेता अल्लू अर्जुनला अटक; कोणत्या कलमांतर्गत गुन्हा दाखल? किती वर्षांची शिक्षा होणार?

अभिनेता अल्लू अर्जुनला अटक; कोणत्या कलमांतर्गत गुन्हा दाखल? किती वर्षांची शिक्षा होणार?

Allu Arjun Arrest News: सुपरस्टार अल्लू अर्जुनलापोलिसांनी आज(13 डिसेंबर 2024) अटक केल्याची माहिती समोर आली आहे. 4 डिसेंबर रोजी हैदराबादमधील संध्या टॉकिजमध्ये 'पुष्पा 2' च्या स्क्रिनिंगदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. त्या घटनेत एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, तर तिचा मुलगा गंभीर जखमी असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

अभिनेता अल्लू अर्जुनसाठी एकीकडे आनंद तर दुसरीकडे दुःख अशी परिस्थिती ओढावली आहे. काही दिवसांपूर्वीच अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' चित्रपट प्रदर्शित झाला असून, या चित्रपटाने बॉक्स ऑफिरसव अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. अवघ्या आठ दिवसांत या चित्रपटाने 1 हजार कोटींचा गल्ला जमवला असून, चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. पण, आता हाच चित्रपट अल्लू अर्जुनसाठी मोठ्या अडचणीचा ठरला आहे. 

त्या दिवशी नेमकं काय झालं?
'पुष्पा 2' चित्रपट 5 डिसेंबर रोजी जगभरात प्रदर्शित झाला, पण 4 डिसेंबर रोजी हैदराबादमधील संध्या टॉकिजमध्ये या चित्रपटाचे स्क्रिनिंग पार पडले. यावेळी अभिनेता अल्लू अर्जुन अचानक टॉकिजमध्ये आला, ज्यामुळे चाहत्यांनी एकच गोंधळ घातला. यावेळी प्रचंड चेंगराचेंगरी झाली, ज्यात रेवती नावाच्या महिलेचा मृत्यू झाला, तर तिचा मुलगा गंभीर जखमी आहे. या अपघातानंतर अल्लू अर्जुनने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक व्हिडिओ पोस्ट करून माफीदेखील मागितली होती. शिवाय, त्या महिलेच्या कुटुंबाला 25 लाख रुपयांची आर्थिक मदतही जाहीर केली होती.

या कलमान्वये गुन्हा दाखल 
या घटनेनंतर महिलेच्या कुटुंबीयांनी अल्लू अर्जुनविरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीत अल्लू अर्जुनसह त्याचे सुरक्षा पथक आणि टॉकिज व्यवस्थापनाचेही नाव आहे. 5 डिसेंबर रोजी दाखल गेलेल्या गुन्ह्यात भारतीय न्यायिक संहितेच्या (BNS) कलम 105 आणि 118 (1) अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी थिएटरचा मालक आणि त्याच्या मॅनेजरलाही अटक केली.

दोषी आढळल्यास किती शिक्षा होणार?
भारतीय न्यायिक संहितेच्या कलम 105 नुसार दोषी आढळलेल्या व्यक्तीला किमान 5 वर्षे ते जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. याशिवाय न्यायालय दोषी व्यक्तीला दंडही ठोठावू शकते. तर कलम 118 (1) मध्ये दोषी आढळल्यास 3 वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे. याशिवाय 20 हजार रुपयांच्या दंडाचीही तरतूद आहे. आता अल्लू अर्जुनला किती शिक्षा होते, हे पाहणे महत्वाचे आहे. 

Web Title: Actor Allu Arjun arrested; Under which section has the case been registered? How many years of imprisonment will he get?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.