'उद्याच्या तेजस्वी पहाटेसाठी!' रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिला लूक समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 10:39 IST2025-12-17T10:38:37+5:302025-12-17T10:39:54+5:30
रितेशच्या सिनेमात मराठीसह हिंदी कलाकारांची तगडी फौज, बघा कोणाकोणाला टॅग केलंय?

'उद्याच्या तेजस्वी पहाटेसाठी!' रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिला लूक समोर
महाराष्ट्राचा लाडका भाऊ रितेश देशमुख आज ४६ वाढदिवस साजरा करत आहे. आपल्या मराठी स्वॅगने संपूर्ण सिनेसृष्टी गाजवणाऱ्या रितेशचे लाखो चाहते आहेत. रितेशचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट 'राजा शिवाजी' पुढील वर्षी रिलीज होणार आहे. सिनेमात मराठी, हिंदी कलाकारांची फौजच आहे. रितेश स्वत: छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आहे. कालच रितेशने पोस्ट शेअर करत सिनेमाचं शूट पूर्ण झालं असल्याची माहिती दिली. तसंच रिलीज डेटही जाहीर केली.
मागे तळपता सूर्य आणि समोर रितेशचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या लूकमधला फोटो. 'राजा शिवाजी' सिनेमाविषयी पोस्ट करत रितेशने लिहिले, "क्षणभर थांबलेला सूर्य..मावळतीचा मावळ..पण क्षणभरासाठीच…उद्याच्या तेजस्वी पहाटे साठी... १०० दिवसांची मेहनत, निष्ठा, समर्पण आणि अपार जिद्द यावर अखेर पडदा पडला. असंख्य आठवणी, असंख्य अनुभव, आणि मनात कायम राहणारे क्षण. महापराक्रमी राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांना सिनेमारूपी अभिवादन घेऊन लवकरच येत आहोत !!!"
रितेश देशमुखने हा सिनेमा स्वत: दिग्दर्शितही केला आहे. तर ज्योती देशपांडे आणि जिनिलिया देशमुखने सिनेमाची निर्मिती केली आहे. रितेशने पोस्टमध्ये संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री लिमये, फरदीन खान, जितेंद्र जोशी यांना टॅग केले आहे. सिनेमाची ही तगडी स्टारकास्ट पाहता प्रेक्षकांची उत्सुकता आणखी शिगेला पोहोचली आहे. तसंच 'राजा शिवाजी'चं हे पोस्टर पाहून अनेकांनी कमेंट करत रितेशचं कौतुकही केलं आहे. त्याच्या या सिनेमाची सिनेसृष्टीतील कलाकारही वाट पाहत आहेत. पुढील वर्षी १ मे रोजी सिनेमा मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम भाषेत रिलीज होणार आहे.