'वयस्कर दिग्दर्शकाने माझ्या खांद्यावर...', श्रीजिता डेसोबत घडला होता कास्टिंग काऊचचा प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2024 01:53 PM2024-03-08T13:53:15+5:302024-03-08T14:09:29+5:30

लोकांची मानसिकता अशी का असते? अभिनेत्रीने केला संतप्त सवाल

लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आणि बिग बॉस १६ मधून प्रसिद्धीझोतात आलेली श्रीजिता डेने (Sreejita De) नुकताच कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव सांगितला. तिच्या करिअरच्या सुरुवातीला तिला अशा घटनेला सामोरं जावं लागलं होतं.

श्रीजिता सिनेमाच्या मीटिंगसाठी कोलकत्याला गेली होती. तिथेच ती एका ज्येष्ठ दिग्दर्शकाला भेटली. यानंतर तिला आलेला अनुभव शॉकिंग होता.

एका मुलाखतीत श्रीजिता म्हणाली, 'मी फक्त १७ वर्षांची असताना मनोरंजन क्षेत्रात प्रवेश केला. मी पश्चिम बंगालच्या हल्दिया या छोट्या शहरातून आले आहे. माझी आई नेहमीच माझी स्ट्राँग सपोर्ट सिस्टीम राहिली आहे. तरीसुद्धा मला कास्टिंग काऊच सारख्या प्रकाराला सामोरं जावं लागलं.'

मला वाटतं समाजात असे लोक मोठ्या संख्येने आहेत. तुम्हाला प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकायची गरज आहे. लोक मला फक्त मीटिंगसाठी बोलवायचे पण त्यांच्याजवळ माझ्यासाठी कोणतीही फिल्म किंवा टेलिव्हिजन ऑफर नसायची.

अनेकदा मीटिंगमध्ये मला सांगण्यात यायचं की आमच्याजवळ मोठ्या दिग्दर्शकाची फिल्म आहे. पण कास्टिंग काऊचही यात होतं. मी अशा लोकांना भेटले हे मी आईपासून कधीच लपवलं नाही.

१९ वर्षांची असताना मला एका बंगाली सिनेमाची ऑफर आली. हा हिंदी फिल्मचा रिमेक होता. मला मीटिंगसाठी बोलावलं. माझी आई कोलकत्यातच होती आणि मी एकटी दिग्दर्शकाला भेटायला गेले. त्यांनी ज्या पद्धतीने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि ज्याप्रकारे माझ्याशी बोलले ते मला अजिबात पटलं नाही. ते वयस्कर दिग्दर्शक होते. तुम्ही लहान जरी असाल तरी कोणता स्पर्श चुकीचा आहे हे लगेच कळतं. मी माझी पर्स उचलून ऑफिसबाहेर पळाले.

मला लोकांची अशी मानसिकता पाहून आश्चर्यच वाटतं. पण मी कोणाच्याच जाळ्यात फसले नाही. मी कायम स्ट्राँग होते आणि जिथे चांगलं काम होतं तिथे लोक तुमच्याशी चुकीच्या पद्धतीने वागत नाहीत.

श्रीजिताने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे. 'उतरन','तुम्ही हो बंधू सखा तुम्ही','लेडीज स्पेशल','लाल इश्क','ये जादू है जिन का' यासह अनेक मालिकांचा समावेश आहे. 2007 साली तिने 'कसौटी जिंदगी की' मालिकेतून पदार्पण केलं.

तिने 'टशन','मान्सून शूटआऊट','लव्ह का दी एंड','रेस्क्यु' यासारख्या सिनेमातही काम केलं आहे.