EXCLUSIVE : जिममधला 'वर्क आउट' हाच 'फिटनेस फंडा' नाही, त्यापेक्षा...; 'हिट अँड फिट' आदिनाथ कोठारेनं दिला मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 10:57 AM2022-12-30T10:57:09+5:302022-12-30T11:07:39+5:30

सध्या सोशल मीडियावर सतत आपल्याला सेलिब्रिटींचे फिटनेससंबंधी फोटो व्हिडिओ दिसत असतात.फिटनेस (Fitness), वर्कआऊट (Workout), चिट डे (Cheat Day) हे शब्द सतत कानावर पडत असतात. सेलिब्रिटी फिटनेसबाबत किती जागरुक आहेत हे कळते. पण त्यांचे फिटनेस रुटीन नेमके कसे असते, कित्येक तास ते जिममध्येच वेळ घालवत असतील असा अनेकांचा समज असतो. हाच समज मराठी अभिनेता 'आदिनाथ कोठारे'ने दूर केला आहे. फिटनेससाठी ओळखल्या जाणाऱ्या आदिनाथ कोठारेने त्याचा 'फिटनेस मंत्रा' लोकमतला दिलेल्या मुलाखतीत शेअर केला आहे.

८३, चंद्रमुखी या सिनेमातून आपले अभिनय कौशल्य दाखवणारा अभिनेता आदिनाथ कोठारे कमालीचा फिट आहे. दैनंदिन जीवनात आपल्याला जशा ठरलेल्या सवयी असतात तसंच व्यायाम हा सुद्धा रोजच्या जीवनातील अविभाज्य भागच झाला असल्याचं आदिनाथ सांगतो. सकाळी उठल्यावर ब्रश करणे, नाश्ता करणे या सवयी आपण विसरत नाही तसेच व्यायामाला सुद्धा रोजच्या जीवनाचा भाग बनवता आला पाहिजे.

दैनंदिन आयुष्यात सातत्य आणि शिस्त या दोन्ही गोष्टी फार महत्वाच्या आहेत. उत्साहात एक दिवस व्यायाम केला आणि ४ दिवस गायब असं करुन फिट राहता येत नाही. यासाठी स्वत:लाच शिस्त आणि वळण लावणं गरजेचं आहे. त्यामुळे शिस्त आणि सातत्य हे माझे फिटनेस मंत्रा आहेत.

आदिनाथचा आणखी एक मोलाचा फिटनेस मंत्राही त्याने शेअर केला आहे. त्याच्या म्हणण्यानुसार तुम्ही घरीच व्यायाम करत आहात किंवा रोज जिम मध्ये जात आहात वर्कआऊट करत आहात म्हणजे तुम्ही फिट असा त्याचा अर्थ होत नाही. जिमच्या बाहेर गेल्यानंतर आपण दिवसभर बाहेर नक्की काय करतोय याचे परिक्षण करा.

दिवसभरातला केवळ १० टक्के वेळ आपण जिममध्ये किंवा व्यायाम करण्यासाठी देतो. पण राहिलेल्या ९० टक्के वेळात आपण इतर कामांमध्ये व्यस्त असतो. मग त्या ९० टक्के वेळात तुम्ही नेमकं काय करता यावर तुमचं फिटनेस अवलंबून आहे.

शरीरासाठी व्यायाम तर महत्वाचा आहेच. पण तुमचा रोजचा आहारही तितकाच महत्वाचा आहे. जेवणाच्या वेळा पाळता का, आहारात पौष्टिक अन्नपदार्थांचा समावेश असतो का हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. एकीकडे जिममध्ये घाम गाळत असाल पण बाहेर गेल्यानंतर तुमचे रुटीन योग्य नसेल तर त्याचा काहीच उपयोग होत नाही.

आदिनाथ सांगतो, जेवणाची वेळ जर पाळली तर अर्ध्याहून काम तर होऊन जातं. रोज एक दिड तास व्यायामासाठी देतो, तर शरीराला थोडा बदल म्हणून तीन दिवसांनंतर एक सुट्टी घेतो. ही सुट्टी म्हणजे माझा चीट डे असतो.

आदिनाथ सोशल मीडियावर आपल्या वर्कआऊटचे, जिममधले फोटो अपलोड करत असतो. अनेक आघाडीच्या कलाकारांमध्ये आदिनाथही सर्वात फिट अभिनेता म्हणून ओळखला जातो. आदिनाथने क्रिमिनल जस्टीसमध्ये पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. यामध्ये त्याचा रफ अॅंड टफ लुक दिसून येतो.

आदिनाथने '८३' या बॉलिवुड सिनेमात माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांची भूमिका साकारली आहे. तर 'चंद्रमुखी' हा त्याचा मराठी चित्रपट हिट झाला.