'खबरदार' सिनेमाच्या वेळी महेश कोठारे झाले होते बेघर; कर्जवाढीमुळे राहत्या घरावर आली होती जप्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 08:35 AM2023-09-29T08:35:32+5:302023-09-29T08:40:14+5:30

Mahesh kothare: महेश कोठारे यांनी त्यांच्या 'डॅमइट आणि बरंच काही' या पुस्तकात त्यांच्या जीवनातील अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.

महेश कोठारे हे नाव सध्याच्या घडीला कोणत्याही मराठी व्यक्तीसाठी नवीन नाही. उत्तम अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक अशी ओळख त्यांनी निर्माण केली आहे.

आजवरच्या कारकिर्दीत महेश कोठारे यांनी अनेक दर्जेदार सिनेमा मराठी कलाविश्वाला दिले. यात खासकरुन धुमधडाका,झपाटलेला, धडाकेबाज, थरथराट या सिनेमांचा आवर्जून उल्लेख केला जातो.

गेल्या कित्येक काळापासून महेश कोठारे मराठी सिनेसृष्टीत सक्रीय आहेत. त्यामुळे त्यांनी कलाविश्वाची प्रत्येक छटा पाहिली आहे. विशेष म्हणजे कलाविश्वातील हेच अनुभव त्यांनी डॅमइट या त्यांच्या पुस्तकात लिहिले आहेत.

महेश कोठारे यांनी 'डॅमइट आणि बरंच काही' हे पुस्तक स्वत: लिहिलं असून या पुस्तकात त्यांनी फिल्मी करिअरसोबतच पर्सनल आयुष्यातील काही प्रसंगीही लिहिले आहेत.

सध्या सोशल मीडियावर महेश कोठारे यांच्या संघर्ष काळाची चर्चा रंगली आहे. डॅमइट या पुस्तकात त्यांनी त्यांच्या स्ट्रगल काळाविषयी लिहिलं आहे.

आज कलाविश्वात महेश कोठारे यांनी नाव, प्रसिद्ध, यश, संपत्ती सारं काही मिळवलं आहे. मात्र, त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता. एक काळ असा होता जेव्हा त्यांना त्यांचं राहतं घर विकावं लागलं होतं.

घर विकण्याविषयी आदिनाथ कोठारे यानेही एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. २००५ मध्ये खबरदार सिनेमा करत असताना महेश कोठारे कर्जबाजारी झाले होते, असं त्याने या मुलाखतीत म्हटलं होतं.

"त्यांनी (महेश कोठारे) एक सिनेमा केला होता पण, तो चालला नाही. त्याचं कर्ज फेडलं जात नव्हतं ते वाढत होतं. आम्ही कोल्हापूरमध्ये शूटिंग करत असताना बँकेने आमच्या मुंबईतील घरावर जप्ती आणली होती. त्यावेळी मी एमबीए करत होतो. पण, मला कधीच आई-बाबांनी त्या गोष्टीची झळ लागू दिली नाही", असं आदिनाथ म्हणाला.

पुढे तो म्हणतो, "त्या बिकट परिस्थितीमध्येही बाबांनी सिनेमाचं शुटिंग पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी मला आणि आजी-आजोबांना पुण्याला नेलं. आम्हाला पुण्याच्या घरात ठेऊन ते मुंबईत भाड्याने राहायला जागा शोधत होते. २००५ हा आमच्यासाठी खूप मोठा लो पॉईंट होता. सिनेमा करत असताना वडिलांनी सगळं गमावलं होतं. पण, त्याच सिनेमाने त्यांना सगळं काही परत केलं. त्यानंतर २०११ मध्ये त्यांनी मराठी सिनेसृष्टीतील सगळ्यात मोठी डील केली. त्यानंतर आमचं सगळं कर्ज फिटलं आणि आमचं घर सुद्धा झालं."