देव आनंदप्रमाणे दिसणं पडलं महागात; अभिनेत्याला काम मिळणंही झालं कठीण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 05:04 PM2022-08-25T17:04:04+5:302022-08-25T17:09:38+5:30

Kishore bhanushali:देव आनंद यांच्याप्रमाणे दिसत असल्यामुळे जितकं कौतुक झालं. तितकंच काम मिळणंही कठीण आहे. बऱ्याच मोठ्या प्रोजेक्टमधून त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

बॉलिवूडचा एक काळ गाजवणारे दिग्गज अभिनेता म्हणजे देव आनंद. बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय कलाकार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचंय.

दर्जेदार चित्रपटांची निवड, उत्तम अभिनयकौशल्य आणि हटके स्टाइल यामुळे ते विशेष लोकप्रिय होते.

सध्या सोशल मीडियावर देव आनंद यांच्याप्रमाणेच हुबेहुब दिसणाऱ्या किशोर भानुशाली यांची चर्चा रंगली आहे.

देव आनंद यांचा डुप्लिकेट म्हणून किशोर भानुशालीकडे पाहिलं जातं. गेल्या ३० वर्षांपासून ते कलाविश्वात सक्रीय आहेत.

देव आनंद यांचा डुप्लिकेट म्हणून नावारुपाला आलेल्या किशोर यांनी कलाविश्वात ३० वर्ष काम करुनही त्यांना म्हणावी तशी प्रसिद्ध वा कामाची संधी मिळाली नाही.

ज्युनिअर देव या नावाने ओळखल्या जाणाऱ्या किशोर यांनी अलिकडेच एका मुलाखतीत त्यांच्या करिअरविषय़ी भाष्य केलं.

"मला लोक ज्युनिअर देव या नावाने हाक मारतात. खरं तर ही माझ्यासाठी मोठी कॉम्प्लिमेंट आहे. पण, देव आनंद यांच्याप्रमाणे दिसत असल्यामुळे मला काही मोठ्या प्रोजेक्टमधून बाहेरही पडावं लागलं. मला कधीही अभिनेता व्हायचं नव्हतं. मला प्रसिद्ध उद्योजक व्हायचं होतं," असं ते म्हणाले.

पुढे ते म्हणतात, "एकदा कोणी तरी मी देव आनंद यांच्याप्रमाणे दिसतो असं सांगितलं होतं. पण, त्यावेळी मला फक्त राजेश खन्ना माहित होते. देव आनंद कोण हे माहितच नव्हतं. त्यानंतर मी त्यांचे काही चित्रपट पाहिले. हे चित्रपट पाहिल्यावर मला खरंच स्वत: मध्ये त्यांच्यासारखा भास होऊ लागला. त्यामुळे मी आराशात पाहून त्यांच्यासारखा अभिनय करु लागलो."

देव आनंद यांच्याप्रमाणे दिसत असल्यामुळे जितकं कौतुक झालं. तितकंच काम मिळणंही कठीण आहे. बऱ्याच मोठ्या प्रोजेक्टमधून मला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

दरम्यान, सध्या किशोर हे भाभीजी घर पर हैं या मालिकेत ते अनिता भाभीच्या काकांची भूमिका साकारत आहेत.