The Kashmir Files, Tax Free: द काश्मीर फाईल्स महाराष्ट्रात 'टॅक्स फ्री' करण्याच्या मागणीला जोर, याआधी 'हे' बॉलिवूड चित्रपट झाले होते राज्यात करमुक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 02:42 PM2022-03-16T14:42:11+5:302022-03-16T15:50:20+5:30

द काश्मीर फाईल्स या चित्रपटाची सध्या देशभरात चर्चा रंगली आहे.

The Kashmir Files, Tax Free: द काश्मीर फाईल्स हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित या चित्रपटात पल्लवी जोशी (Pallavi Joshi), अनुपम खेर (Anupan Kher), मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, मिथून चक्रवर्ती, दर्शन कुमार यांसारख्या अनुभवी कलाकारांची फौज आहे.

उत्तर प्रदेश, गोवा, त्रिपुरा, मध्य प्रदेश, कर्नाटक, हरयाणा, गुजरात आणि उत्तराखंड या आठ राज्यांमध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा चित्रपट पाहण्याचे देशवासीयांना आवाहन केले आहे.

महाराष्ट्रातील जनसामान्यांनादेखील काश्मीरमधील इतिहासावर आधारित हा चित्रपट माफक दरात पाहता यावा यासाठी द काश्मीर फाईल्स हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात यावा, अशी मागणी जोर धरत आहे. पाहुया याआधी कोणकोणते बॉलिवूड सिनेमे महाराष्ट्रात टॅक्स फ्री झाले होते.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या जीवनावर आधारित ‘सचिन - अ बिलियन ड्रिम्स’ हा चित्रपट महाराष्ट्रात तसेच दिल्ली, छत्तीसगड आणि केरळमध्ये टॅक्स फ्री करण्यात आला होता.

छत्रपती शिवाजी महाराजांचा शूर योद्धा तानाजी मालुसरे यांच्या शौर्याची कहाणी सांगणारा ‘तान्हाजी - द अनसंग वॉरिअर’ हा चित्रपट महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, हरियाणा राज्यात टॅक्स फ्री करण्यात आला होता.

एअर हॉस्टेस असणाऱ्या नीरजा यांच्या धाडसाची कहाणी असलेला ‘नीरजा’ हा चित्रपटदेखील महाराष्ट्रसह दिल्ली, उत्तर प्रदेशमध्ये टॅक्स फ्री होता.

दिवंगत अभिनेता इरफान खान याच्या अभिनयाने सजलेला ‘हिंदी मिडियम’ हा चित्रपट महाराष्ट्रात तसेच दिल्ली, मध्य प्रदेश व गुजरातमध्ये टॅक्स फ्री होता.

भारताची शान असलेल्या महिला बॉक्सर मेरी कोम यांच्या जीवनावरील चरित्रपट ‘मेरी कोम’ हा चित्रपटही महाराष्ट्रात टॅक्स फ्री करण्यात आला होता.

द काश्मीर फाईल्स महाराष्ट्रात टॅक्स फ्री करावा अशी मागणी सध्या सुरू आहे. त्यामुळे याबाबत महाराष्ट्र सरकार काय निर्णय़ घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. (सर्व फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम, IMDb, सोशल मीडिया)