किंग खान शाहरुख सोडणार 'मन्नत', गौरी खान अन् मुलांसह भाड्याच्या घरात राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 15:19 IST2025-02-26T15:05:00+5:302025-02-26T15:19:17+5:30

शाहरुख खान लवकरच त्याचा 'मन्नत' बंगला सोडणार असून कुटुंबासह भाड्याच्या घरात राहायला जाणार आहे.

किंग खान शाहरुख (Shahrukh Khan) आणि त्याचा मुंबईतील आलिशान 'मन्नत' (Mannat) बंगल्याचं सर्वांनाच आकर्षण आहे. जगभरातून मुंबईत येणाऱ्या शाहरुखच्या चाहत्यांसाठी ते एखाद्या पर्यटन स्थळापेक्षा कमी नाही.

'मन्नत' हा बंगला समुद्राच्या किनारी मुंबईतील वांद्रे परिसरातील बँडस्टँड येथे आहे. हा बंगला २७००० चौरस फूटाचा आहे.

शाहरुख खानने २००१ साली १३ कोटींना 'मन्नत' बंगला विकत घेतला होता. तेव्हा बंगल्याचं नाव विला विएना असं होतं. शाहरुखनं बंगल्याचं नाव बदलून मन्नत ठेवलं. आज याची किंमत तब्बल २०० कोटींपेक्षा जास्त आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून शाहरुख आपल्या कुटुंबासह या बंगल्यात राहतोय. पण, आता शाहरुखला हा बंगला सोडावा (Shah Rukh Khan To Move Out Of Mannat To Rented Apartments) लागणार आहे.

कारण, आता हा बंगला आणखी भव्य करण्यात येणार आहे. मन्नतमध्ये नूतनीकरणाचं काम होणार आहे.

हिंदुस्तान टाईम्सनुसार, गेल्या दोन वर्षांपासून मन्नतमध्ये नूतनीकरणाचे काम करायचं होतं. मन्नतमध्ये आणखी दोन मजले बांधले जातील, असे म्हटलं जात आहे. ज्यासाठी गौरी खानला महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीकडून परवानगी मिळाली आहे.

मन्नत ही एक ऐतिहासिक संपत्ती आहे. १९१४ साली हा बंगला बांधला गेला होता. त्यामुळे यात कोणताही मोठा बदल करण्याआधी परवानगी घ्यावी लागते.

त्यामुळे शाहरुख खान आपल्या कुटुंबासह काही महिन्यांसाठी दुसऱ्या ठिकाणी राहण्यास जाणार आहे. शाहरुखनं मन्नत बंगल्याजवळच २ लॅव्हिश ड्युप्लेक्स अपार्टमेंट भाड्यावर घेतलं आहे. मन्नत तयार होईपर्यंत शाहरुख ड्युप्लेक्स अपार्टमेंटमध्ये राहिलं.

हे ड्युप्लेक्स अपार्टमेंट शाहरुख खानने र्माता जॅकी भगनानी (Jacky Bhagnani) आणि त्याची बहीण दीपशिखा (Deepshikha) यांच्याकडून भाड्यावर घेतले आहेत.

यासाठी तो वर्षाला तब्बल २.९० कोटी रुपये भरणार आहे. याचा अर्थ तो महिन्याला २४.१५ लाख रुपये मोजणार आहे. दोन्ही अपार्टमेंट पाली हिल स्थित पूजा कॅसा इमारतीत आहेत. या पॉश ठिकाणी अनेक बॉलिवूड स्टार्स राहतात.