टीव्हीवर जिला पाहिलं, एका महिन्यात तीच बनली को-स्टार; अभिनेत्याने थेट तिच्याशी लग्नच केलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 12:25 IST2025-02-20T12:14:48+5:302025-02-20T12:25:16+5:30
या बॉलिवूड कपलची लव्हस्टोरीही फिल्मीच आहे.

मनोरंजविश्वात अशा अनेक जोड्या आहेत ज्यांची लव्हस्टोरी खूपच हटके आहे. जोड्या स्वर्गात बनतात ते काही जणांच्या बाबतीत खरंच झालं आहे.
बॉलिवूडमध्ये अशीच एक गोड जोडी आहे. त्याने टीव्हीवरच्या जाहिरातीत तिला पाहिलं आणि तो प्रेमातच पडला. नंतर तीच त्याच्या सिनेमाची हिरोईन म्हणून समोर आली.
ही जोडी आहे राजकुमार राव(Rajkumar Rao) आणि पत्रलेखा (Patralekha). दोघांची लव्हस्टोरी अगदीच फिल्मी आहे. राजकुमारने अनेक मुलाखतींमध्ये ही गोष्ट सांगितली होती.
तो म्हणाला,"मी एकदा टीव्हीवर एका जाहिरातीत तिला पाहिलं. मला ती खूपच क्युट वाटली. हिला भेटावं, हिच्याशी लग्न करता आलं तर किती छान होईल असंही माझ्या मनात आलं होतं."
"आता नशीब बघा दोन महिन्यानंतर मी मुंबईहून पुण्याला जात होतो. माझ्या एका मित्राने गाणं शूट करण्यासाठी बोलवलं होतं. तसंच गाण्यात माझ्यासोबत एक मुलगी असेल जी तुझ्यासोबतच मुंबईहून येईल असंही तो म्हणाला.
"आम्ही कारमध्ये बसलो. तेव्हा मी तिला पटकन ओळखलं नाही. पण जेव्हा आम्ही एकमेकांना आधीच्या कामांविषयी विचारलं तेव्हा तिने त्या जाहिरातीचा उल्लेख केला. मला लगेच क्लिक झालं की ही तीच आहे."
"मी मनात म्हटलं हा तर देवाने दिलेला इशाराच आहे. मी ही संधी सोडू शकत नाही. मग मी तिच्याशी ओळख वाढवली, तिला इम्प्रेस केलं आणि आम्ही डेट करायला लागलो."
राजकुमार आणि पत्रलेखाने ११ वर्ष एकमेकांना डेट केलं आणि २०२१ मध्ये ते लग्नबंधनात अडकले. 'सिटीलाईट्स' सिनेमात त्यांनी एकत्र काम केलं.