सुपरस्टार रजनीकांत यांचे दमदार कमबॅक; 3 दिवसांत 'जेलर'ने केली 222 कोटींची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2023 07:28 PM2023-08-13T19:28:20+5:302023-08-13T19:33:37+5:30

रजनीकांत यांच्या मागील काही चित्रपटांनी चांगली कामगिरी केली नव्हती. पण, 'जेलर'मधून त्यांनी दमदार पुनरागमन केले आहे.

सुपरस्टार रजनीकांत यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले की, त्यांना भारतीय चित्रपटसृष्टीत लिजेंड का म्हणतात. दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर चाहत्यांना आपल्या लाडक्या हिरोला मोठ्या पडद्यावर पाहता आले. 10 ऑगस्ट रोजी 72 वर्षीय रजनीकांत यांचा 'जेलर' हा सिनेमा रिलीज झाला. रिलीज होताच या चित्रपटाने धुमाकूळ घातला.

रजनीकांत यांचा चाहतावर्ग किती मोठा आहे, हे त्यांच्या 'जेलर' चित्रपटाच्या तीन दिवसांच्या कमाईवरुन दिसून येईल. चित्रपटाने पहिल्या दिवशी फक्त भारतात 48 कोटींची कमाई केली होती. आता चित्रपटाने रिलीजच्या तीन दिवसानंतर कमाईचा डोंगर उभारला आहे. भारतासोबतच परदेशातही चित्रपट धुमाकूळ घालताना दिसत आहे.

पहिल्या दिवशी सॉलिड कमाई केल्यानंतर दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत थोडा घट झाली आणि शुक्रवारी जेलरने 25.75 कोटी कमावले. पण, शनिवारी पुन्हा ग्रिप पकडली आणि 34 कोटींचा बिजनेस केला. अवघ्या तीन दिवसांतच जेलरने फक्त भारतात 108 कोटींची कमाई केली. तमिळनाडूसोबतच केरळ, कर्नाटक आणि आंध्र-तेलंगणात चित्रपट खूप चालतोय.

वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिसवर नजर टाकली तर रजनीकांत यांच्या 'जेलर'ने तगडी कमाई केली आहे. भारतात 127 कोटी रुपयांचे ग्रॉस कलेक्शन करणाऱ्या जेलरने ओव्हरसीज मार्केटमध्ये आतापर्यंत 95 कोटींपेक्षा जास्तीची कमाई केली आहे. 3 दिवसांतच 'जेलर'चे ग्रॉस कलेक्शन 222 कोटी रुपये झाले आहे. चौथ्या दिवसापर्यंत चित्रपट 300 कोटींच्या पुढे जाईल.

रजनीकांत भारतातील त्या अभिनेत्यांपैकी आहेत, ज्यांची भारतासह जगभरात फॅन फॉलोइंग आहे. त्यांच्या चित्रपटाची भारतासह परदेशातही चांगली कमाई होते. अमेरिकेत चित्रपटाने तीन दिवसांत 3 मिलियन डॉलर्स (25 कोटी) पेक्षा जास्त कमावले आहेत. तर आखाती देशात सर्वाधिक कमाई करणारा तमिळ चित्रपट बनला आहे.

सौदी अरब, कुवैत, UAE सारख्या आखाती देशात 'जेलर'ने 3 दिवसांत 3.3 मिलियन डॉलर (27.36 कोटी) ची कमाई केली आहे. चौथ्या दिवसापर्यंत चित्रपटाचे ओव्हरसीज ग्रॉस कलेक्शन 130 कोटी रुपयांच्या पुढे जाईल. ही आतापर्यंतची सर्वाधिक कमाई आहे. यापूर्वी रजनीकांत यांच्या '2.0' ने आखाती देशात सर्वाधिक कमाई केली होती.

रजनीकांत पॅन इंडिया सुपरस्टार असूनही त्यांच्या मागील काही चित्रपटांनी ('पेट्टा, 'दरबार' आणि 'अन्नाथे') बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली नव्हती. पण, आता 'जेलर' द्वारे त्यांचा तगडा कमबॅक झाला आहे. या चित्रपटाचे कथा लोकांना खूप आवडत आहे, त्यामुळे रजनी यांच्या चाहत्यांनी चित्रपट सुपर डुपर हिट केलाय.