इअर एन्डला सुट्टी टाकलीय? मग 'हे' सहा सिनेमे सहकुटुंब बघा, नव्या वर्षासाठी मिळेल नवी उमेद!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 12:35 IST2025-12-24T11:56:52+5:302025-12-24T12:35:28+5:30
ख्रिसमस आणि इयर एन्डला सुट्टी आहे आणि घरीच असाल तर हे सहा सिनेमे नक्कीच बघा. वर्षाची अखेर आणि नवीन वर्षाची सुरुवात छान होईल

२०२५ हे वर्ष पुढील काहीच दिवसांमध्ये संपणार आहे. अशातच बहुतेक जण ख्रिसमस आणि २०२५ च्या अखेरीस कुठेतरी फिरण्याचा प्लान करत असतील. तर काही जण मात्र घरीच असतील. अशा लोकांसाठी सहकुटुंब सहपरिवार बघण्यासारखे खास सिनेमे पुढीलप्रमाणे

२००४ साली आलेला 'द पोलार एक्सप्रेस' हा सिनेमा ख्रिसमसच्या दिवसांमध्ये आवर्जून पाहिला जातो. हा चित्रपट एका अशा लहान मुलाची गोष्ट सांगतो, ज्याचा ख्रिसमस आणि सांता क्लॉजवरील विश्वास उडू लागला असतो. ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला एक जादूई रेल्वे अर्थात 'द पोलर एक्सप्रेस', त्याच्या घराबाहेर येऊन थांबते. तो मुलगा या रेल्वेने प्रवास करतो. पुढे त्याचा प्रवास कसा रंजक होतो याची कहाणी 'द पोलार एक्सप्रेस'मध्ये दिसते. हा सिनेमा तुम्हाला जिओ+हॉटस्टारला पाहता येईल.

इयर एंड आणि ख्रिसमसच्या सुट्ट्यांमध्ये कॉमेडी आणि भावुक करणारा सिनेमा बघायचा असेल तर 'एल्फ' (Elf) हा आणखी एक चांगला ऑप्शन आहे. हा चित्रपट बडी नावाच्या एका माणसाची गोष्ट आहे, जो लहानपणी चुकून सांता क्लॉजच्या खेळण्यांच्या पिशवीत शिरतो. तिथे एल्फ्स त्याला लहानाचा मोठा करतात. जेव्हा त्याला समजते की तो माणूस आहे, तेव्हा तो आपल्या खऱ्या वडिलांच्या शोधात न्यूयॉर्क शहरात येतो. पुढे काय होतं याची रंजक कहाणी तुम्हाला 'एल्फ'मध्ये बघायला मिळेल. हा सिनेमा प्राईम व्हिडीओवर पाहता येईल.

२०२४ साली आलेला कतरिना कैफ आणि विजय सेथुपती यांचा 'मेरी ख्रिसमस' हा बॉलिवूड सिनेमा एका मर्डर मिस्ट्रीवर आधारीत आहे. हा सिनेमा ख्रिसमस हॉलिडेसाठी एक परफेक्ट ऑप्शन आहे. हा सिनेमा तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. नेटफ्लिक्सवर तुम्हाला हा सिनेमा पाहता येईल

'होम अलोन' हा सुट्टीत पाहण्यासाठी आणखी एक परफेक्ट ऑप्शन आहे. हा चित्रपट ८ वर्षांच्या केविन मॅकलिस्टर नावाच्या मुलाची गोष्ट आहे. ख्रिसमसच्या सुट्टीत त्याचे संपूर्ण कुटुंब चुकून त्याला घरीच विसरून पॅरिसला फिरायला जाते. सुरुवातीला केविनला एकटं घरी राहण्याचा खूप आनंद होतो, पण लवकरच त्याची नजर हॅरी आणि मार्व्ह नावाच्या दोन चोरांवर पडते. पुढे केविन या चोरांना कसं पळवतो, याची खास कहाणी 'होम अलोन'मध्ये दिसते. हा सिनेमा जिओ+हॉटस्टारला ओटीटीवर पाहता येईल.

हॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेता अॅडम सँडलर यांचा 'ग्रोन अप्स' हा सिनेमा चांगलाच गाजला. शिक्षकांच्या शोकसभेनिमित्ताने एकाच शाळेत शिकलेले मित्र अनेक वर्षांनी एकत्र येतात. त्यानंतर ते सहकुटुंब ट्रीप प्लॅन करतात. पुढे या मित्रांचा प्रवास पाहताना आपणही खळखळून हसतो. हा सिनेमा तुम्हाला झी ५ या ओटीटीवर पाहता येईल

ऑस्कर विनिंग 'द शॉशँक रिडेम्पशन' हा सिनेमा वीकेंडसाठी परफेक्ट ऑप्शन आहे. बायकोच्या प्रियकराच्या हत्येच्या खोट्या आरोपाखाली अँडीला जन्मठेपेची शिक्षा होते. पण पुढे शॉशँक नावाच्या तुरुंगातून हुशारीने कसा पळ काढतो याची उत्कंठावर्धक कहाणी 'द शॉशँक रिडेम्पशन' सिनेमात दिसते. या सिनेमातील काही संवाद प्रेरणादायी आहेत. प्राईम व्हिडीओवर हा सिनेमा पाहू शकता.

















