"शरीरावरील स्ट्रेच मार्क्समुळे..." अर्जुन कपूरची बहीण अंशुलाने सांगितला बॉडीशेमिंगचा 'तो' अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2023 03:22 PM2023-05-09T15:22:50+5:302023-05-09T15:37:24+5:30

अंशुला कपूरचा लुक आता पूर्णपणे बदलला आहे.

बॉलिवूड अभिनेता अर्जून कपूरची (Arjun Kapoor) छोटी बहीण अंशुला कपूरबद्दल (Anshula Kapoor) फार कमी ऐकलं असेल. अंशुला चित्रपटसृष्टीपासून नेहमीच दूर असते. मात्र ती सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे.

अंशुलाचा सध्या बदललेला लुक नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतोय. यापूर्वी तिचं वजन जास्त होतं तसंच तिच्यात आत्मविश्वासाची कमी असल्याचंही जाणवायचं. आता मात्र अंशुला खूपच ग्लॅमरस झाली आहे हे तिच्या फोटोंमधून लक्षात येईल.

अंशुला गेल्या काही काळापासून एका गंभीर आजाराने त्रस्त होती. वयाच्या 14 व्या वर्षीच तिला 'पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम' या आजाराने ग्रासले होते. यामुळे तिचं वजन प्रमाणापेक्षा जास्त वाढलं होतं.

अंशुलाला तिचं वाढतं वजन झेपत नव्हतं. तिच्या शरिरावर स्ट्रेचमार्क्स दिसत होते ज्यामुळे तिला लाज वाटायची असं तिने नुकतंच सोशल मीडियावर पोस्ट करत शेअर केलं.

अंशुलाने पोस्टमध्ये लिहिलं,"आपण स्वत:लाच चांगल्या नजरेने पाहण्यात कमी का पडतो? बाह्य सुंदरतेलाच आपण जास्त महत्व देतो आणि मन किती स्वच्छ आहे हे पाहतच नाही. सकारात्मक गोष्टी बघण्याऐवजी आपण नकारात्मकतेकडे झुकतो."

अंशुला अनेक वेळा बॉडी शेमिंगची शिकार झाली आहे. मात्र आता तिने स्वत:ला पूर्णपणे बदललं असून तिच्यात आत्मविश्वासही आला आहे. तिने बरंच किलो वजनही घटवलं आहे. बहीण सोनम कपूरने तिच्या या पोस्टला पाठिंबा दिला.

अंशुला सध्या तिच्या बॉयफ्रेंडसोबतच्या फोटोंमुळेही चर्चेत असते. दोघांचं खुल्लमखुल्ला प्रेम बघून नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.तिचा बॉयफ्रेंड रोहन ठक्कर हा लेखक आहे. तसंच त्याने याआधी मार्केटिंग एक्झिुक्युटिव्ह आणि कॉपी रायटरचे काम केले आहे. २०१६ साली आलेल्या 'दि नॉवेलिस्ट' या शॉर्ट फिल्मचा स्क्रीनप्ले त्याने लिहिला आहे.

अंशुला आणि रोहनचे फोटो सोशल मीडियावर कायम चर्चेचा विषय असतात. दोघांचा स्विमिंग पूलमधला एक फोटो काही दिवसांपूर्वीच व्हायरल झाला होता.