"अभिनयला काही जणांनी टार्गेट केलं..."; 'उत्तर'च्या दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत; म्हणाला- "तुझ्या बाबांच्या..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 11:29 IST2025-12-15T11:28:21+5:302025-12-15T11:29:12+5:30
नुकत्याच रिलीज झालेल्या 'उत्तर' सिनेमाचा दिग्दर्शक क्षितीज पटवर्धनने अभिनय बेर्डेसाठी खास पोस्ट लिहिली आहे. इंडस्ट्रीतील वास्तव यामुळे उलगडलं आहे

"अभिनयला काही जणांनी टार्गेट केलं..."; 'उत्तर'च्या दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत; म्हणाला- "तुझ्या बाबांच्या..."
अभियन बेर्डे, ऋता दुर्गुळे यांची प्रमुख भूमिका असलेला 'उत्तर' हा सिनेमा १२ डिसेंबरला रिलीज झाला. भावुक विषय आणि कलाकारांचा सुंदर अभिनय यामुळे 'उत्तर' सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशातच 'उत्तर' सिनेमाचा दिग्दर्शक क्षितीज पटवर्धनने अभिनय बेर्डेविषयी मनातील भावना शेअर केल्या आहेत. क्षितीजने लिहिलेली पोस्ट अत्यंत महत्वाची आहे.
क्षितीजने 'उत्तर' सिनेमातील अभिनयचा फोटो पोस्ट करुन लिहिलंय की, ''सिनेमा प्रदर्शित होईपर्यंत थांबलो होतो... अभिनयला मी कास्ट केलं तेव्हा खूप भुवया उंचावल्या होत्या. सिनेमा प्रदर्शित व्हायच्या आधी सुद्धा काही जणांनी सोशल मीडियावर त्याला टार्गेट केलं, (ज्यात आमच्या क्षेत्रातली सुद्धा लोकं होती) 'अभिनय' शब्दावर कोटी करून तुला हे जमत नाही, ते जमत नाही वगैरे बडबड केली पण आम्ही दोघेही शांत राहिलो.''
''दहा महिने फक्त निनाद कसा असेल, कसा बोलेल, बघेल, वागेल यावर काम केलं, त्याने कठोर मेहनत घेऊन १२ -१३ किलो वजन कमी केलं आणि काल जेव्हा हाऊसफुल गर्दीतून "नन्या superb!" अशी दिलखुलास आरोळी आम्ही ऐकली तेव्हा एकमेकांकडे फक्त पाहिलं आणि हसलो. त्याला लोकांचा गराडा पडला. मी बाजूला झालो. अनेक आया त्याच्याशी बोलता बोलता रडायला लागल्या आणि पुढे अर्धा तास मी हे सुखावून टिपत राहिलो.''
''सगळ्या परीक्षणांमध्ये त्याचं भरभरून कौतुक आलंय, दोनच दिवसात मराठीतले उत्तमोत्तम दिग्दर्शक त्याचं काम बघून खुश झालेत आणि त्याला 'डिस्कव्हरी' म्हणतायत आणि प्रेक्षक तर त्याला आपला घरचाच मुलगा मानतात, त्यामुळे त्याच्या यशाने ते ही आनंदून गेलेत याची जाणीव काल पुन्हा एकदा लख्खपणे झाली.''
''टिपिकल पुणेरी मराठी मुलाचा मोल्ड आम्हाला मोडायचा होता, तरुण पिढीला आपला वाटेल असा नवा इंजिनिअर उभा करायचा होता आणि मराठीत दीर्घ पल्यात काम करू शकेल असा नायक दाखवायचा होता त्याची ही सुरुवात आहे. काल हाऊसफुल शोज ना जाऊन आल्यानंतर मी म्हणलं "तुझ्यावर लोकं एवढं प्रेम करतात, याचाही बाकीच्यांना त्रास होत असेल की! आणि तुझ्या बाबांच्या बाबतीत सुद्धा असचं होतं!" त्यावर तो म्हणाला "आपल्या क्षेत्रात एकतर उगवतीचा किंवा मावळतीचा सूर्य बघायला आवडतो सर, दुपारी १२ चा कोणाला नको असतो!" तो सत्तावीसचा आहे पण सत्तरीच्या अनुभवासारखं बोलला.''
''त्याला जे मिळतंय ते फार कमी लोकांना मिळतं कारण कदाचित त्याने जे पाहिलंय ते फार कमी लोकांनी पाहिलंय! तेवढी शक्ती, संयम आणि तयारी त्याच्यात आहे, म्हणूनच वाटतं अभिनय, जिथे कुठे असतील, लक्ष्मीकांत सरांना तुझा प्रचंड अभिमान वाटत असणारे! तू जे काम केलंयस त्या इतकाचं तू जसं हे सगळं हाताळलं आहेस त्याचा सुद्धा! Love you for what you are!''