प्रेमाचा गोडवा आणखी वाढणार! 'गुलकंद'मधील 'चंचल' लव्ह साँग रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 11:52 IST2025-03-12T11:51:23+5:302025-03-12T11:52:03+5:30
Gulkand Movie: प्रेमावर आधारीत 'गुलकंद' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे या सिनेमात महाराष्ट्राची हास्यजत्रामधील विनोदवीरांची फौज पाहायला मिळणार आहे.

प्रेमाचा गोडवा आणखी वाढणार! 'गुलकंद'मधील 'चंचल' लव्ह साँग रिलीज
प्रेमावर आधारीत 'गुलकंद' (Gulkand Movie) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे या सिनेमात महाराष्ट्राची हास्यजत्रामधील विनोदवीरांची फौज पाहायला मिळणार आहे. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि वेलक्लाऊड प्रॉडक्शन्स निर्मित या बहुप्रतीक्षित चित्रपटातील पहिलंवहिलं गाणं 'चंचल' नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. चित्रपटातील या सुरेल गाण्यानं रसिकांच्या मनाला हळूवार स्पर्श केलाय.
चंचल गाण्यात दाखवण्यात आलेली प्रेमाची सुंदर आणि गोड दृश्यं प्रेक्षकांच्या मनात घर करणारी असून या भावपूर्ण गाण्यांना मंदार चोळकर यांनी शब्दबद्ध केले आहे तर अविनाश - विश्वजीत यांनी संगीत दिले आहे. ओठांवर सहज रुळणारं हे गाणं आनंदी जोशी आणि रोहित राऊत यांनी गायलं आहे. दोन्ही जोडप्यांच्या नात्यांमधील केमिस्ट्री आणि हलक्याफुलक्या क्षणांची गुंफण मनाला भिडणारी असून प्रेमाचे हे सुरेख क्षण या गाण्यातून सुंदरपणे टिपण्यात आले आहेत.
दिग्दर्शक आणि निर्माते सचिन गोस्वामी म्हणाले की, "'गुलकंद' हा चित्रपट म्हणजे प्रेमाच्या गोड आठवणींचा साखरपाकच. प्रेम हा फक्त मोठ्या भावनांचा विषय नसून, ते लहानसहान क्षणांमध्ये, हलक्याफुलक्या हळवेपणात लपलेलं असतं. हेच या गाण्यातून आम्ही दाखवायचा प्रयत्न केला आहे. 'गुलकंद' हा चित्रपट प्रेमाच्या विविध छटांचा वेध घेणारा असून प्रेमात पडलेल्या प्रत्येकाला हे गाणं आवडेल.''
'गुलकंद'मध्ये दिसणार हे कलाकार
सचिन मोटे लिखित आणि सचिन गोस्वामी दिग्दर्शित या चित्रपटात सई ताम्हणकर, समीर चौघुले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खरात, मंदार मांडवकर, जुई भागवत, तेजस राऊत, शार्विल आगटे यांसारखे तगडे कलाकार आहेत. सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाब्रिया यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.