अदिती राव हैदरीच्या शेजारी बसलेला सिद्धार्थ जाधव म्हणाला, "माझी बायको हिच्यापेक्षाही सुंदर..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 16:22 IST2026-05-08T16:21:43+5:302026-05-08T16:22:56+5:30
सिद्धार्थ जाधव हा मराठी चित्रपटांतील अभिनेता आहे. त्याने मराठी आणि हिंदी चित्रपटांबरोबरच अनेक दूरदर्शन मालिका आणि नाटकांतूनही काम केले.

अदिती राव हैदरीच्या शेजारी बसलेला सिद्धार्थ जाधव म्हणाला, "माझी बायको हिच्यापेक्षाही सुंदर..."
सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) हा चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. प्रेक्षकांना हसवण्याची एक वेगळीच हातोटी असलेल्या सिद्धार्थला 'कॉमेडी किंग' म्हटले जाते. नुकताच तो कपिल शर्माच्या 'द ग्रेट इंडियन कपिल शो' (The Great Indian Kapil Show) मध्ये 'गांधी टॉक्स' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहोचला होता. यावेळी सिद्धार्थने एका मजेशीर प्रश्नावर आपल्या पत्नीबद्दल जे विधान केले, त्याची चर्चा आता संपूर्ण सोशल मीडियावर रंगली आहे.
'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये ए. आर. रहमान, विजय सेतुपती आणि अदिती राव हैदरी यांच्यासोबत सिद्धार्थ जाधव पाहुणा म्हणून उपस्थित होता. शो दरम्यान कृष्णा अभिषेक आणि कीकू शारदा आपल्या विनोदी शैलीत पाहुण्यांची फिरकी घेत होते. कृष्णा अभिषेक रडण्याचे नाटक करत अदिती राव हैदरीला म्हणाला, "तुझं लग्न झालं ना?" त्यावर कीकूने विचारले, "तू का रडतोयस?". कृष्णा म्हणाला, "मी सिद्धार्थ साठी रडतोय. कारण अदितीच्या पतीचं नावही सिद्धार्थ आहे. हा सिद्धार्थ विचार करत असेल की, काश तो सिद्धार्थ मी असतो आणि अदिती माझी असती...".
कृष्णाचा हा पंच ऐकताच सिद्धार्थने एका क्षणाचाही विलंब न लावता अत्यंत हजरजबाबीपणे उत्तर दिले. सिद्धार्थ म्हणाला, "असं काही नाहीये, माझी बायकोसुद्धा अदिती राव हैदरीसारखीच सुंदर आहे... किंबहुना तिच्यापेक्षाही चांगलीच आहे यार, असं काय...". सिद्धार्थच्या या उत्तराने स्टेजवर टाळ्यांचा कडकडाट झाला. ग्लॅमरच्या दुनियेत एका सौंदर्यवती अभिनेत्रीसमोर बसलेले असतानाही, स्वतःच्या पत्नीचा असा सन्मान राखल्यामुळे सिद्धार्थचे कौतुक होत आहे.