"...म्हणून लक्ष्याने मुलाचं नाव अभिनय ठेवलं", रेणुका शहाणेंनी सांगितला कधीच न ऐकलेला खास किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 13:57 IST2025-11-17T13:53:58+5:302025-11-17T13:57:56+5:30
लक्ष्मीकांत बेर्डेंची आठवण काढताच रेणुका शहाणे भावुक झाल्या. याशिवाय त्यांनी अभिनय बेर्डेचं नाव ठेवण्यामागचा खास किस्सा सांगितला

"...म्हणून लक्ष्याने मुलाचं नाव अभिनय ठेवलं", रेणुका शहाणेंनी सांगितला कधीच न ऐकलेला खास किस्सा
रेणुका शहाणे या मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री. रेणुका यांनी 'हम आपके है कौन' सिनेमात साकारलेली भूमिका आजही चाहत्यांच्या लक्षात आहे. 'हम आपके है कौन'मध्ये रेणुका शहाणेंसोबतलक्ष्मीकांत बेर्डेंनीही काम केलं होतं. लक्ष्मीकांत आणि रेणुका यांची घनिष्ट मैत्री होती. त्यामुळे लक्ष्मीकांत यांची आठवण मनात येताच त्या भावुक झाल्या. याशिवाय मुलाचं नाव अभिनय ठेवण्यामागे लक्ष्मीकांत बेर्डें यांचं काय कारण होतं, याचाही खुलासा रेणुका त्यांनी केला.
रेणुका शहाणेंनी आरपारला दिलेल्या मुलाखतीत हा खास किस्सा सांगितला. मुलाचा जेव्हा झाला तेव्हा लक्ष्याने त्याचं नाव अभिनय ठेवलं. लक्ष्याने ही गोष्ट रेणुका शहाणेंना सांगितली. रेणुका शहाणेंनी लक्ष्याने ठेवलेल्या नावाचं कौतुक केलं. पुढे लक्ष्याने हे नाव ठेवण्यामागचं कारण रेणुका यांना सांगितलं. लक्ष्या म्हणाला, ''सगळे म्हणतील, लक्ष्याचा अभिनय उत्तम आहे.''
रेणुका शहाणेंनी पुढे खुलासा केला की, ''कुठेतरी कॉमेडी करता करता कलाकाराला तेवढा सन्मान मिळत नाही. दुर्दैव आहे हे. कारण कलाकार म्हणून कॉमेडी करणं खूप कठीण आहे. पण जे ड्रामाटिक कलाकार असतात त्यांच्याबद्दल एक वलय असतं की उत्तम कलाकार आहेत वगैरे. लक्ष्याने इमोशनल भूमिका सुद्धा खूप अप्रतिम केल्या आहेत. पण त्याला वाव मिळाला नाही. त्यामुळे त्याला कुठेतरी वाटलं की, लक्ष्याचा अभिनय उत्तम आहे, मस्त आहे.'' अशाप्रकारे लक्ष्याने मुलाचं नाव अभिनय बेर्डे ठेवण्यामागचा खास किस्सा रेणुका यांनी सांगितला.