'तू दूर का..' नंतर ओंकार भोजनेचं आणखी एक गाणं व्हायरल, 'चिपळूण आमचं गाव रे...' ऐकलं का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2023 16:15 IST2023-07-28T16:11:36+5:302023-07-28T16:15:10+5:30
ओंकार भोजनेला कवितेची, गायनाचीही आवड आहे.

'तू दूर का..' नंतर ओंकार भोजनेचं आणखी एक गाणं व्हायरल, 'चिपळूण आमचं गाव रे...' ऐकलं का?
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधून लोकप्रिय झालेला कलाकार ओंकार भोजनेचे (Onkar Bhojne) चाहते काही कमी नाहीत. ओंकार प्रचंड टॅलेंटेड आहे हे त्याने कामातून सिद्ध केलंय. विनोदी भूमिका असो किंवा कविता, गाणी त्याचा सहज अभिनय मन जिंकून घेतो. ओंकारने हास्यजत्रेच्या स्टेजवर एका स्किटमध्ये 'तू दूर का अशी तू दूर का...' हे गाणं गायलं होतं आणि नंतर ते प्रचंड व्हायरल झालं होतं. आता ओंकारचं आणखी एक गाणं सोशल मीडियावर व्हायरल होतंय.
ओंकारने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. तो एका स्टेजवरुन प्रेक्षकांशी संवाद साधत आहे. यावेळी त्याने आणखी एक गाणं सादर केली आहे. 'चिपळूण आमचं गाव रे...' हे गाणं त्याने सादर केलं आणि प्रेक्षकांमधून टाळ्या आणि शिट्ट्यांचा कडकडाट झाला. ओंकारसोबत प्रेक्षकांनीही हे गाणं प्रचंड एन्जॉय केलं.
ओंकारने एका गावात हे गाणं सादर केलं. त्याला प्रेक्षकांनी चांगलीच दाद दिल्याचं व्हिडिओतून दिसत आहे. ओंकारने हास्यजत्रा सोडल्यानंतर प्रेक्षक त्याच्यावर नाराज झाले होते. मात्र नवीन काहीतरी करायचं म्हणून त्याने कार्यक्रमातून एक्झिट घेतली. 'सरला एक कोटी' या सिनेमात त्याने मुख्य भूमिका साकारली. आता लवकरच तो 'कलावती' चित्रपटात दिसणार आहे.