अरे हाड, आम्ही प्रश्न विचारणार... सत्तेतल्या प्रत्येकाला...; अभिनेता आस्ताद काळेचे सरकार, राजकारण्यांवर कडक ताशेरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2021 11:18 IST2021-04-28T11:17:36+5:302021-04-28T11:18:41+5:30
देशातील कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता आस्ताद काळे याने सरकार आणि राजकारण्यांवर ताशेरे ओढले आहेत.

अरे हाड, आम्ही प्रश्न विचारणार... सत्तेतल्या प्रत्येकाला...; अभिनेता आस्ताद काळेचे सरकार, राजकारण्यांवर कडक ताशेरे
कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील परिस्थिती चिंताजनक होत चालली आहे. दररोज कोरोना रुण्यांच्या संख्येत वाढ होताना दिसते आहे. तसेच काहींचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयातील परिस्थिती चिंताजनक होत असून बेड मिळत नसल्यामुळे आणि ऑक्सिजन अभावी अनेकांनी प्राण सोडले आहेत. कोरोनामुळे देशात हाहाःकार उडाल्यानंतर आता देशभरातून राजकारणी आणि सरकारवर टीका होताना दिसते आहे. दरम्यान मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता आस्ताद काळे याने सरकार आणि राजकारण्यांवर ताशेरे ओढले आहेत.
बिग बॉस फेम आस्ताद काळेने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर सरकार आणि राजकारण्यांवर निशाणा साधला आहे. त्याने म्हटले की, प्रश्न विचारायचे आहेत...स्वत्व जपायचं आहे....कदाचित जीव गमवावा लागू शकतो...कारण..श्शु!!! कुठे काही बोलायचं नाही....अरे हाड.....आम्ही प्रश्न विचारणार....सत्तेच्या आणि सत्तेतल्या प्रत्येकाला....उत्तरं न देता आम्हाला गप्प करू बघाल तर तुम्ही किती नागडे आहात तेच दिसणार.....नागडे राजकारणी...नागडं सरकार...नागडा देश....निरोप घेतो....
आस्ताद काळेच्या या पोस्टवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत.
आस्तादने देशातील राजकारणी, राज्य आणि केंद्र सरकारला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सवाल केला आहे. त्याने देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने रौद्ररुप घेतलेले असताना देशात चार राज्यात निवडणुका झाल्या. त्यासाठी रॅली काढण्यात आल्या. त्यावर आस्तादने टीका करत म्हटले की, सरकारला प्रश्न विचारले पाहिजे तर काहीतरी होऊ शकते. निवडणुक अमूक काळ उलटल्यानंतर घेणे हे आपल्या संविधानात लिहिले आहे. पण ते परिस्थिती पाहून बदलू शकतो याची तरतूददेखील संविधानात केलेली आहे.
सध्याच्या घडीला निवडणूक घेणे महत्त्वाचे आहे की परिस्थिती आटोक्यात आणणे महत्त्वाचे आहे. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सरकारकडे एक वर्षे होते. मग ते राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार..तुम्ही एका वर्षात केलंत काय ?, असा सवालही आस्तादने केला.
आस्ताद काळेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर शेवटचा तो कलर्स मराठी वरील चंद्र आहे साक्षीला या मालिकेत पहायला मिळाला. या मालिकेने काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. याशिवाय तो संजय जाधवच्या वेबसीरिजमध्ये आस्ताद काम करताना दिसणार आहे. शूटिंगला अजून सुरूवात झालेली नाही, मात्र सध्या ऑनलाइन वर्कशॉप सुरू आहे.