अशोक सराफांना महाराष्ट्र भूषण जाहीर होताच जितेंद्र आव्हाडांची लक्षवेधी पोस्ट, म्हणाले - 'मोठ्या "धूमधडाक्यात" ...'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 02:06 PM2024-01-31T14:06:09+5:302024-01-31T14:12:36+5:30

आपल्या विनोदी पण दमदार अशा अभिनयाने, अशोक सराफ यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

NCP (Sharad Pawar faction) leader Jitendra Awhadhas congratulated Ashok Saraf after announcing the Maharashtra Bhushan award | अशोक सराफांना महाराष्ट्र भूषण जाहीर होताच जितेंद्र आव्हाडांची लक्षवेधी पोस्ट, म्हणाले - 'मोठ्या "धूमधडाक्यात" ...'

अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण जाहीर झाल्यावर जितेंद्र आव्हाडांची पोस्ट, म्हणाले…

मराठी मनोरंजन विश्वातील  (Marathi Film Industry) बहारदार व्यक्तिमत्व म्हणजे अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf). आपल्या दमदार अभिनयाने गेली अनेक वर्ष रसिकांचं त्यांनी भरपूर मनोरंजन केलं. नुकताच त्यांना राज्याचा सर्वोच्च 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार जाहीर करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मंगळवारी या पुरस्काराची घोषणा केली. यानंतर सर्वस्तरावरून अशोक सराफ यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही खास पोस्ट करत त्यांचं अभिनंदन केलं. 

  जितेंद्र आव्हाड यांनी 'एक्स' वर पोस्ट करत अशोक सराफ यांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी लिहलं, 'ज्येष्ठ अभिनेते श्री.अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालाय.ही आनंदाची बातमी आहे.आमचं  तारुण्य आणि त्याच्या आठवणी चिरतरुण ठेवणाऱ्या या "अफलातून" नायकास हा पुरस्कार देताना या सरकारने कोणतीही "बनवाबनवी" केली नाही,याचा आनंदच आहे.आता मोठ्या "धूमधडाक्यात" त्यांना हा पुरस्कार प्रदान व्हावा,या सदिच्छा..!'

महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अशोक सराफ यांनी आनंद व्यक्त केला आहे. या पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर 'मला एवढ्या लवकर महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळेल असं वाटलं नव्हतं. मला माझं काम तेवढंही वाटत नव्हतं. मला महाराष्ट्र भूषण दिग्गजांच्या पंक्तीला नेऊन बसवलंय त्यामुळे मी नि:शब्द झालोय. मी अतिशय भारावून गेलो आहे', अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच त्यांच्या पत्नी अभिनेत्री निवेदिता यांनीही आनंद व्यक्त केला आहे. 

आपल्या विनोदी पण दमदार अशा अभिनयाने, अशोक सराफ यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. अशोक सराफ यांनी 1969मध्ये ‘जानकी’ या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. यानंतर त्यांनी 'दोन्ही घरचा पाहुणा' या सिनेमातून  सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. मात्र, 1975मध्ये आलेल्या दादा कोंडके यांच्या 'पांडू हवालदार' या आयकॉनिक चित्रपटाने त्यांना मोठे यश मिळालं. यानंतर अशोक सराफ यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. त्यांनी मराठीत जितकी व्हरायटी दिली तितकी कोणीच दिली नाही. त्यामुळे महाराष्ट्रभूषण देऊन राज्य सरकारने एका बहुरूपी कलाकाराचा सन्मान केला, अशी भावना चित्रपटसृष्टीतून व्यक्त होत आहे. 
 

Web Title: NCP (Sharad Pawar faction) leader Jitendra Awhadhas congratulated Ashok Saraf after announcing the Maharashtra Bhushan award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.